‘ध्येय गाठायचे असेल तर चिकाटी बाळगा…!’
ध्येय गाठायचे असेल तर चिकाटी बाळगा, आपण विजय मिळवणारच, हे मनाशी पक्के ठाम करा आणि मगच कामाला लागा. विद्यार्थ्यांना जर त्यांचे निश्चित ध्येय गाठायचे असेल तर खडतर प्रयत्न करा, मेहनत करा, सातत्याने अभ्यास करा, पण अभ्यास करतानाच आपल्या कलागुणांना मात्र विसरू नका, असे आवाहन फर्मागुढीतील गोपाळ गणपती देवस्थानचे अध्यक्ष तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.
फर्मागुढीतील गोपाळ गणपती देवस्थानच्या सभागृहात देवस्थान ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा गेल्या मंगळवारी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद गावडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पत्रकार नरेंद्र तारी, मयुर तिळवे, प्रकाश बांदोडकर, गुरुदास नाईक, नीलेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंद गावडे व इतरांच्या हस्ते समई प्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
गोविंद गावडे म्हणाले की, कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आधी मनाची तयारी करावी लागते. आपण हाती घेतलेले काम पूर्ण करणारच, अशी स्वतःच स्वतःच्या मनाला खात्री द्यावी लागते, त्यानुसार अथक कष्ट घ्यावे लागतात, नंतरच विजय दृष्टीपथात येतो.
मयुर तिळवे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संधी आणि अभ्यासक्रम याविषयी मार्गदर्शन केले. एखादा विषय हाताळताना एकाग्रता किती महत्त्वाची आहे, हा विषय समजून घेताना त्यासाठी लागणारी हातोटी आणि अभ्यासावरील लक्ष केंद्रीत करण्याची पद्धत यासंबंधी सांगताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नागरी सेवेतही चांगल्या संधी असल्याचे नमूद केले.