देश/जग
“माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपकडून करोडो रुपये खर्च”
नवी दिल्ली :
काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) शनिवारी दिल्लीत पोहोचली. भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींना दिल्लीत जनतेचा पाठिंबा मिळाला. यादरम्यान सुप्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनीही राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभाग घेतला होता. त्यानंतर राहुल गांधींनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केले. यावेळी भारत जोडो यात्रेचे ध्येय द्वेष नष्ट करणे आहे. भाजपने माझ्याविरोधात षडयंत्र रचले. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने करोडो रुपये खर्च केले, असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
शनिवारी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समर्थकांच्या गर्दीला संबोधित करताना सांगितले की, ‘हे पीएम मोदींचे नाही तर अंबानी आणि अदानींचे सरकार आहे. आम्ही भारतात पसरलेला द्वेष संपवू. भाजप आणि आरएसएस मिळून द्वेष पसरवत आहेत. शेकडो किलोमीटर चालल्यानंतर देशात कुठेही हिंसा आणि द्वेष दिसला नाही, पण प्रत्येकवेळी टीव्हीवर दिसून येतो. तसेच, देशातील खऱ्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप सरकार हिंदू-मुस्लीम यांच्यात द्वेष पसरवत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) पुढील नऊ दिवस नवी दिल्लीत असण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) दिल्लीत राहुल गांधी यांना सोनिया गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वड्रा यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा मिळाला. दरम्यान, राहुल गांधी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली वाहणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच, राहुल गांधी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली अर्पण करतील.