शेवटचा सामन्यातील विजयासह भारताचे निर्भेळ यश
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने ९० धावांनी जिंकत मालिकेत ३-०ने निर्भेळ यश संपादन केले. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३८५ धावा धावफलकावर लावल्या. तीन गडी बाद करत ब्रेक थ्रू मिळवून देणाऱ्या शार्दूल ठाकूरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुबमनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
टीम इंडियाने ठेवलेल्या डोंगराएवढ्या ३८६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. शून्य धावांवर असताना हार्दिक पांड्याने फिन अॅलनला बाद केले मात्र त्याचा साथीदार डेव्हॉन कॉनवेने भारतीय गोलंदाजांना चौकार-षटकार मारत त्याने अक्षरशः चोपून काढले. त्याचे एवढे धाडस झाले कारण टीम इंडियाचा यष्टीरक्षक इशान किशनने त्याच्या स्टंपिंगची चालून आलेली संधी गमावली. त्यावेळी तो ४७ चेंडूत ५७ धावांवर खेळत होता. किशनच्या एका चुकीमुळे टीम इंडिया इंदोरच्या सामन्यात संकटात सापडली होती. अखेर तो १३८ धावा करून तो बाद झाला, अन्यथा भारताला सामना जिंकणे अवघड होते तरीदेखील तब्बल ८१ धावांचा फटका भारताला बसला. अखेर न्यूझीलंडचा डाव २९५ धावांवर आटोपला. आणि भारताने तब्बल ९० धावांनी विजय मिळवला.
हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी डेव्हॉन कॉनवेला साथ देत धावांचा पाठलाग करण्यास मदत केली. त्यांनी अनुक्रमे ४२, २४ आणि २६ धावा केल्या. कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांना मात्र दोन आकडी धावसंख्या देखील गाठला आली नाही. अखेरपर्यत टिकून राहिलेला मिचेल सँटनर ३४ धावांवर बाद झाला. तळाच्या फलंदाजांनी त्याला साथ दिली नाही. डॅरिल मिशेल आणि डेव्हॉन कॉनवे यांची अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर भारताला ब्रेक थ्रू मिळवणे आवश्यक होते अशातच मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने ४५ धावांत ३ गडी बाद करत टीम इंडियाची गाडी पुन्हा रूळावर आणली. त्याला कुलदीप यादवने ३ गडी बाद करत साथ दिली. उमरान मलिकने १ आणि चहलने २ गडी बाद केले.