‘पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मारेकर्यांवर कारवाई करा’
कराड (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधात बातमी दिल्यामुळे अंगावर चारचाकी वाहन घालून जाग्यावर ठार मारले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर योग्य ती कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया सातारा जिल्हा, कराड तालुका संघटनेच्यावतीने निवेदन देवून करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, कराडचे प्रातांधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक डाॅ. रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दैनिक महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी विरोधात वृत्त दिले होते. त्यामुळे राजापूर हायवे येथे रिफायनरी समर्थक जमीन दलाल यांनी शशिकांत वारीशे यांच्या अंगावर वाहन घालून मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे दोषी आरोपी गावगुंड याच्यावर मनुष्यबादाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत अटक केली नसून तो मोकाट फिरत असल्यामुळे त्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या आरोपीस कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने केली आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष संतोष नलावडे, सुनिल परीट, सकलेन मुलाणी, अजिंक्य गोवेकर, स्वप्नील गव्हाळे, तबरेज बागवान, शुभम बोडके, सोहेल मुलानी, आतिश पवार, ओमकार सोनावले, अमोल टकले, सरफराज मुल्ला, सुहास कांबळे आदी उपस्थित होते.