सातारा
”त्या’ उपसा योजनांची कामे पूर्ण करुन कार्यान्वित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु’
सातारा (महेश पवार) :
खंडाळा तालुक्यातील निरा- देवधर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या गावडेवाडी, शेख मीरवाडी, वाघोशी या निधी उपलब्ध झालेल्या उपसा सिंचन योजनांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून योजना कार्यान्वित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिला आहे.
यावेळी जिल्ह्याप्रमुख पुरुषोत्तम जाधव, अटीत माजी सभापती एस वाय पवार, शामराव धायगुडे मोरवे, खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील धोम बलकवडी पोट कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या 14 गावांना नवीन उपसा सिंचन योजनेद्वारे ओलिताखाली आणण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनलक्ष्मी योजनेतील कालवा प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मंत्रालयात सचिव दीपक कपूर
तसेच मुख्य अभियंता जलसंधारण नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तुम्ही सिंचन भवन येथे जाऊन चर्चा करण्याचे सुचविले. त्यांच्या निर्देशाप्रमाणे सिंचन भवन पुणे येथे कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे श्री अतुल कपोले यांच्याबरोबर गेल्या आठवड्यात बैठक केली. त्यावेळी शासन निर्णय निरा देवधर प्रकल्प तालुका भोर जिल्हा पुणे या प्रकल्पाच्या रूपाने 3976.83 कोटी प्रत्यक्ष कामासाठी 3602.88 कोटी व अनुषंगिक खर्च रुपये 373.95 कोटी रुपये तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये गावडेवाडी शेखमीरवाडी व वाघोशी या तीन उपसा सिंचन योजनांची संकल्पने व रेखाचित्रे मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडून प्राप्त होऊन अंतिम झाल्यावरच निविदा कार्यवाही करण्यात यावी तसेच प्रकल्पाचे काम नियोजनानुसार सुधारित प्रशासकीय मान्यता किंमतीच्या मर्यादित पूर्ण करण्यात यावे, संपूर्ण लाभ क्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थेत हस्तांतरित करावे,
सदर प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर सुधारित प्रशासकीय मर्यादेबाहेर जाऊन निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातील मुद्द्यांची पूर्तता करावी, आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा शासन मान्य प्रकल्पात समावेश करू नये. प्रकल्पाचे एकूण पाणी वापरामधून पॉईंट 93 एमसी पाणी धोम बलकवडी प्रकल्पासाठी देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे, असा असा शासन निर्णय झालेला आहे.
यामध्ये तातडीने गावडेवाडी, शेखमीरवाडी व वाघोशी या तीन उपसा सिंचन योजनांची संकल्पचित्रे आणि रेखाचित्रे मध्यवर्ती संकल्पचित्र कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावीत, अन्यथा खंडाळा तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी पाणी प्रश्नासाठी तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार आहोत, याची जबाबदारी शासनाची राहील, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आमच्या जमिनी कवडीमोल दराने औद्योगीकरणासाठी घेण्यात आल्या. आमच्या पूर्वजांना पाण्याचे गाजर दाखवून आमच्या जमिनीवर पुनर्वसन लादण्यात आले आणि आमच्या वाट्याचे पाणी आमच्या डोळ्यात देखत वर्षानुवर्ष सातत्याने पळवण्यात आले.
कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या या पाणी प्रश्नासाठी तोंड उचकटताना आतापर्यंत दिसला नाही, म्हणून आता संघर्ष अटळ आहे. तिन्ही उपसा सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध असून देखील रेखाचित्रांमध्ये काम अडकले आहे. त्यामुळे ताबडतोब त्या कामाची पूर्तता करण्यात यावी आणि उपसा सिंचन योजनांची भूमिपूजन करून योजना कार्यान्वित करावी. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे आमच्या पुढील पिढीसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे संघर्ष करायला तयार आहोत.
आमच्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्याशिवाय आम्ही पुढे पाणी जाऊन देणार नाही, ही आमची भूमिका ठाम आहे. त्यामुळे तुमचे रेखांकन आराखडे तातडीने करून घ्या अशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी बावडा येथील खंडाळा तालुक्याचे माजी सभापती 84 वर्षीय एस वाय पवार यांनी हा प्रश्न लवकर सोडवा अन्यथा आम्ही प्राणांतिक उपोषण करू, असा इशारा दिला.