किल्ले सज्जनगड उजळला शेकडो मशालींनी!
परळी (महेश पवार) :
छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या किल्ले सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट हजारो मशाली प्रज्वलित करून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले सज्जनगड नव्हे तर परळी पंचक्रोशी दुमदुमून निघाली होती. तसेच गडावरील दोन्ही महाद्वार बुरुजावर विद्युत रोषणाई व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. समाधी मंदिर, श्रीधरकुटी येथे फुलांची आरस करण्यात आली होती.
पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता सज्जनगड दुर्गसंवर्धन समूहाच्यावतीने मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः पहाटे चार वाजता भातखळे (वाहनतळ) येथून फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांचा कडकडाटत शिंग तुतारी ललकारीत फुलांचा व रांगोळीचा सडा पायरी मार्गावर करण्यात आला होता.
पालखीच्या पाठीमागे शेकडो मावळे मशाली घेऊन पायरी मार्गाने गडावर पोहोचले. गाईमुख, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार मार्गे पालखी अंगलाई मंदिराकडे आली यावेळी पारंपारिक आगीचे खेळ करण्यात आले यानंतर अंगलाई मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी गडाच्या तटावरून धाब्याच्या मारुतीकडे नेण्यात आली. यावेळी संपूर्ण तट मशालीने प्रज्वलित झाला होता. यानंतर मुख्य समाधी मंदिरा मार्गे पेठेतील मारुती मंदिर श्रीधर कुटी मार्गे आंगलाई मंदिराकडे पालखी आणण्यात आली. पारंपारिक आगीचे खेळ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी समाधी मंदिराकडे प्रस्थान झाली. यावेळी उपस्थित शिवभक्तांचा शिवरायांच्या जयजयकार सुरूच होता रामदास स्वामी संस्थांच्या प्रांगणात सहासी खेळ सादर करण्यात आली व ध्येय मंत्र म्हणण्यात आला यावेळी गडावरील संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
मशाल महोत्सवास पर जिल्ह्यातूनही उपस्थिती
सज्जनगडावरील मशाल उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी कोल्हापूर सांगली पुणे यांसारख्या पर जिल्ह्यातूनही समर्थ भक्त शिवभक्त यांनी रविवारी रात्रीच मुक्कामी सज्जनगडावर येत मशाल महोत्सव याचा अनुभव घेण्यात आला यावेळी इतिहासाचा वारसा जतन करत असल्यामुळे यावेळी आयोजकांचे आभार मानण्यात आले.
टीम दुर्गसंवर्धनाचे कौतुक
गड संवर्धनाच्या दृष्टीने सन 2020 पासून सुरु असलेल्या गडसंवर्धनने मसालोत्सव साजरा केल्यामुळे परळी पंचक्राशीतील युवकांचे चांगलेच संघटन झाले आहे. अंधक्कारातून प्रकाशाकडे एका पाठोपाठ प्रज्वलीत होणाऱया उत्स्फूर्तेच्या या पेटत्या मशालीमुळे पहाटेच्या समयी संपुर्ण परळी भागाचे लक्ष वेधून घेणारा ठरतो.