
राज्य चित्रपट महोत्सवात ‘कुपांचो दर्यो’चे धवल यश
पणजी :
नुकत्याच झालेल्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या ११ व्या आवृत्तीमध्ये नॉन फिचर फिल्म विभागात सहित प्रकाशनच्या ‘कुपांचो दर्यो या कोंकणी लघुपटाने धवल यश प्राप्त करत, या विभागातील सर्वच्या सर्व सहा पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. कला अकादमी येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या हस्ते ‘कुपांचो दर्यो’च्या टीमला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सहित प्रकाशनच्यावतीने २०२१ मध्ये कुपांचो दर्यो या कोंकणी लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. सदर लघुपट त्यावर्षीच्या इफफीमध्ये गोवन स्टोरीज विभागाने वर्ल्ड प्रीमिअरसाठी निवडला होता. त्याचप्रमाणे देश -विदेशातील विविध लघुपट महोत्सवामध्ये देखील या लघुपटाने विविध पुरस्कार आजवर पटकावले होते. १४ ते १७ ऑगस्ट दरम्यान पणजी येथे आयोजित १०, ११ आणि १२ व्या राज्य चित्रपट महोत्सवात ११ व्या आवृत्तीसाठी ‘कुपांचो दर्यो’ची निवड करण्यात आली होती. १७ अगस्त रोजी मॅकेनिज पॅलेस येथे या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते. १७ रोजी झालेल्या तिन्ही आवृत्तीच्या जाहीर पुरस्कार वितरण समारंभात ११ व्या आवृत्तीतील नॉन फिचर फिल्म विभागात ‘उत्कृष्ट नॉन फिचर फिल्म’, उत्कृष्ट थीम, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट ध्वनिरेखन, उत्कृष्ट छायाचित्रण, उत्कृष्ट संकलन अशा सगळेच पुरस्कार आपल्या नावावर नोंदवत धवल यश संपादित केले.
राज्य चित्रपट महोत्सवात कुपांचो दर्योला मिळालेले पुरस्कार आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आम्ही सगळेच ऋणी आहोत. सुरुवातीपासूनच या लघुपटाला विविध अंतराष्ट्रीय महोत्सवात विविध पुरस्कार मिळाले आहेत, पण आज मिळालेले राज्य पुरस्कार हे घरच्या लोकांनी केलेले कौतुक आहे. त्यामुळे त्याचे अप्रूप नक्कीच जास्त आहे. सहितच्यावतीने आम्ही नेहमीच आशयघन गोष्टी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, यापुढेदेखील गोंयकार आमच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास आम्हां सगळ्यांना आहे, असे यावेळी कुपांचो दर्योच्या टीमच्यावतीने किशोर अर्जुन यांनी सांगितले.
किशोर अर्जुन आणि हिमांशू सिंग लिखित कुपांचो दर्योचे दिग्दर्शन हिमांशू सिंग याने केले आहे. तर यात रावी किशोर आणि उगम जाम्बवलीकर यांच्या मुख्य भूमिका असून, अश्विन चिडेने सिनेमॅटोग्राफी केली आहे. तर, गोपाल सुधाकरने संकलन, दौलत पालयेकरने संगीत, भावेश फुलारीने ध्वनिरेखन केले आहे. या काव्यात्म लघुपटात प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक उदय भेम्बरे यांची कविता असून किशोर अर्जुनने लिहिलेल्या कोंकणी गीताला गायत्री पाटील आणि दौलतने स्वर दिला आहे.