लिझ ट्रस यांनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा
लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारून अवघे काही आठवडेच झाले होते. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात येईल. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी काही धोरणांची अंमलबजावणी केली. मात्र त्यांनी ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यांत त्यांनी पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लिझ ट्रस यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र अवघ्या ४५ दिवसांमध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. याच कारणमुळे येथील महागाई ४० वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८०नंतरची सर्वात मोठी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. ब्रिटनमधील महागाई आणि राबवलेल्या अर्थविषयक धोरणामुळे लिझ यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
गेल्या महिनाअखेरीस ट्रस यांनी मांडलेला ‘छोटा अर्थसंकल्प’ वादात सापडला. त्यानंतर त्यातील तरतुदी मागे घेण्याची नामुष्की अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्यावर आली. वादग्रस्त ‘छोटय़ा अर्थसंकल्पा’मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली. यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर ट्रस या महिन्याभरताच पायउतार झाल्या आहेत.