गोवा

मडगांवसाठी नियोजन हवे, गोंधळ नव्हे : ‘मडगावचो आवाज’ची टीका

मडगाव :

मडगावचो आवाजने मडगाव नगरपालिका घेत असलेल्या अनेक घाईघाईच्या निर्णयांवर जोरदार टीका केली आहे. हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प, जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण,  पार्किंग शुल्काची अंमलबजावणी आणि नगरपालिकेच्या शुल्कांमध्ये झालेली मोठी वाढ हे सगळे निर्णय केवळ सहा महिन्यांचा कार्यकाळ उरलेला असताना घेतले जात आहेत, हे संशयास्पद आहे आणि नियोजनाचा अभाव स्पष्ट करतो, असे युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.


“हे सगळे निर्णय ‘मडगांव मास्टर प्लान 2041’ आणि तथाकथित ‘स्मार्ट सिटी’ योजनेशी सुसंगत आहेत का? की हे निव्वळ राजकीय हेतूने घेतलेले निर्णय आहेत, ज्यामध्ये ना लोकांचा सहभाग आहे ना तांत्रिक विचार?” असा सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला आहे.


जुन्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा मुद्दा उपस्थित करताना नायक म्हणाले, “दशकानु दशके तिथे व्यवसाय करणाऱ्या गाडे व्यावसायीकांचे काय होणार? सौंदर्यीकरणाच्या नावाखाली त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा येणार का? याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेय का? संबंधित हितधारकांशी चर्चा झालीय का?” असा सवाल प्रभव नायक यांनी विचारला आहे.


किनारी शहर असलेल्या मडगावमध्ये हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प राबवण्याची घाई देखील प्रश्नचिन्ह निर्माण करते. “गोव्यातील उष्ण, खारट हवामानात हा प्रकल्प यशस्वी होईल का? जर तो फसला, तर जबाबदारी कोण घेणार? आणि ज्या पालिकेला स्वतःची वाहने नीट सांभाळता येत नाहीत, ती अशा प्रकल्पाची देखभाल कशी करणार?” याची उत्तरे नायक यांनी मागितली आहेत.


मडगाव नगरपालिकेने नागरिकांच्या खिशावर टाकलेला आर्थिक बोजा देखील मडगावचो आवाजने अन्यायकारक आणि जनविरोधी ठरवत निषेध नोंदवला आहे. “महागाई आणि ढासळलेल्या नागरी सेवांमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशा वेळी शुल्कवाढ ही पालिकेची असंवेदनशीलता आणि चुकीच्या प्राधान्यक्रमाचं उदाहरण आहे,” असे प्रभव नायक म्हणाले.


“मी माननीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून मडगाव नगर पालिकेच्या अलीकडील बैठकीत घेतलेले सर्व मुख्य निर्णय पुन्हा विचारात घ्यावेत आणि स्थगित करावेत. मडगावचे भवितव्य एका निष्क्रिय आणि कार्यकाळ जवळजवळ संपलेल्या नगरपालिकडे सोपवता येणार नाही,” असे आवाहन नायक यांनी शेवटी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!