पणजी:
गोवा प्रदेश काँग्रेस समितीन् आज पणजी पोलीस ठाण्यात कर्नाटक भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांच्या विरोधात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल पोलीस तक्रार दाखल केली.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, अमरनाथ पणजीकर, विजय भिके, महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी आदींनी पणजी पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षकांच्या गैरहजेरीत उपनिरीक्षकांकडे पणजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कॉंग्रेस शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांचीही भेट घेऊन त्यांना या तक्रारीची प्रत सादर केली व त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली.
आम्ही पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि तात्काळ एफआयआर दाखल करण्याची आणि चित्तापूर मतदारसंघातील कर्नाटक भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांच्या सदर जीवे मारण्याच्या धमकीच्यी ध्वनिफितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांची ‘हत्या’ करण्याचा “भयानक कट” उघड झाला आहे असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
राजकीय प्रतिस्पर्ध्यांबद्दल भाजपचा द्वेष भारताचे सुपुत्र आणि दलित नेता मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबाला मारण्याचा कटातून स्पष्ट दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व तसेच भारतीय निवडणूक आयोगानेही सदर ‘हत्येचा कट’ उघड झाल्यानंतर मौन बाळगले आहे हे धक्कादायक आहे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
देशभरात आता काँग्रेस पक्षाला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आणि कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने घाबरलेल्या भाजप पक्षाचे नेतृत्व आता कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हत्येचा कट रचत आहेत. त्यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी भाजपने दिली आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी सांगितले.
चित्तापूर येथील भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवरून “हत्येचा कट” अगदी स्पष्ट आहे. सदर मणिकांत राठोड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अगदी जवळचे आहेत, असे काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.