मडगाव रवींद्र भवनकडून पुन्हा एकदा गोमंतकीय कलाकारांचा अपमान : विशाल पै काकोडे
मडगाव : पुन्हा एकदा रवींद्र भवन मडगावचे हुकूमशहा अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी गोमंतकीय नाट्यसंस्थांना डावलून पुण्याच्या एका नाट्यसंघाला ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी होणाऱ्या तथाकथित दुरुस्ती झालेल्या पाय तियात्रिस्त हॉल आणि ब्लॅक बॉक्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. गोमंतकीय प्रतिभेला वारंवार डावलण्याचा हा प्रकार “विकास” नव्हे, तर गोमंतकीय कलाक्षेत्राचा अपमान आणि रंगभूमी दिनाच्या आत्म्यालाच तडा देणारा प्रकार आहे, अशी तीव्र टीका कलाकार आणि गोवा राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केली आहे.
“गेल्या अनेक वर्षांपासून मी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे की अध्यक्ष राजेंद्र तालक यांची हुकूमशाही आणि अहंकारी कार्यपद्धतीमुळे गोमंतकीय कलाकारांचा आत्मविश्वास आणि मनोबल खच्चीकरण झाले आहे,” असे विशाल पै काकोडे म्हणाले. “त्यांच्या प्रशासनाने सातत्याने गोमंतकीय संस्था आणि कलाकारांना दुर्लक्षित करून बिगर-गोमंतकीय कलाकार आणि संस्थांना प्राधान्य दिले आहे. इतक्या वेळा तक्रारी करूनही कला व संस्कृती खात्याने या भेदभावाविरोधात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी दस्तऐवजी पुराव्यांसह दाखवून दिले आहे की रवींद्र भवन मडगावच्या वार्षिक कार्यक्रम खर्चापैकी ७० टक्क्यांहून अधिक निधी बिगर-गोमंतकीय कलाकार आणि गटांवर खर्च होतो. स्थानिक कलाकार व संस्थांच्या प्रोत्साहनासाठी असलेला हा निधी बाहेरच्या कलाकारांवर उधळला जात असून, गोमंतकीय नाट्य, संगीत आणि नृत्य गटांना स्वतःच्या भूमीत संधी मिळणे कठीण झाले आहे.”
“गोव्यात शेकडो प्रशिक्षित कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, तियात्रिस्ट आणि युवक गटांची समृद्ध कलासंस्कृती आहे. त्यांना बळ देण्याऐवजी सध्याचे अध्यक्ष रवींद्र भवनला स्वतःचे खासगी साम्राज्य बनवून बसले आहेत, जिथे पारदर्शकता, समावेशकता आणि जबाबदारी यांचा पूर्ण अभाव आहे. गोमंतकीय कलाकार आता आपल्या करातून उभारलेल्या रंगमंचावर बाहेरच्यांचा कब्जा पाहत आहेत,” असे विशाल पै काकोडे म्हणाले.
“कला-संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी या वारंवार घडणाऱ्या गैरप्रकारांची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत. रवींद्र भवन मडगावच्या आर्थिक निर्णयांवर, कार्यक्रम धोरणांवर आणि कलाकार निवड प्रक्रियेवर सखोल चौकशी व्हावी. तसेच, राज्य सरकारने किमान ८५ टक्के कार्यक्रम आणि निधी गोमंतकीय कलाकार आणि संस्थांसाठी राखीव ठेवण्याचा नियम करावा आणि बाहेरच्या सहयोगांसाठी पारदर्शक निकष निश्चित करावेत,” अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली.
“एक कलाकार म्हणून मी सरकारला ठामपणे आवाहन करतो की सध्याची रवींद्र भवन मडगाव समिती बरखास्त करून प्रामाणिक तसेच गोमंतकीय कला व संस्कृतीची जाण असलेल्या व्यक्तींची समिती स्थापन करावी. सध्याच्या अध्यक्षांच्या अहंकारी आणि पक्षपाती वागणुकीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, रवींद्र भवन मडगाव हे आता गोमंतकीय कलाकारांचे केंद्र राहिलेले नाही; ते बाहेरच्यांसाठी व्यासपिठ आणि प्रशासनिक अहंकाराचे प्रतीक बनले आहे,” असा दावा विशाल पै काकोडे यांनी केला आहे.

