मोरोक्कोत विनाशकारी भूकंप; ३०० लोकांचा मृत्यू
नेपाळ, तुर्कस्थान या देशांनंतर आता आफ्रिका खंडातील मोरोक्को या देशात विनाशकारी भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत २९६ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
त्यानंतर आता स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. याशिवाय मोरोक्कोला हवी ती मदत देण्यासाठी तयारीही मोदी यांनी दर्शवली आहे. मोरोक्कोत ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून त्यामुळं अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहे. मोरोक्कोतील माराकेश हे शहर भूकंपाचं केंद्र होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ०३ वाजून ४१ मोरोक्कोतील मारकेश आणि रबात या शहरांमध्ये भूकंप झाला आहे. आफ्रिकेतील १२० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि विनाशकारी भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपामुळं अनेक जून्या तसेच नव्या इमारती कोसळल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पहाटे भूकंपाचे धक्के बसताच घाबरलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर आता अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्षणार्धात घरदारांसह आप्तजनांना गमावल्याने अनेकांनी घटनास्थळी आक्रोश केला.
मोरोक्कोतील माराकेश या शहरालगत असणाऱ्या प्रांतात सर्वाधिक नुकसान झालं आहे. मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्यानंतर जवानांनी आतापर्यंत २९६ लोकांचे मृतदेह मलब्याच्या बाहेर काढले आहे. याशिवाय जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने इमारतींचा मलबा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. केवळ शहरी भागातच नाही तर मोरोक्कोतील ग्रामीण भागातही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यानंतर आता आफ्रिका, युरोप, आशिया या खंडातील देशांनी मोरोक्कोला संकटकाळात मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे.