माजी मंत्री सुखराम यांचे निधन
नवी दिल्ली:
माजी केंद्रीय केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते.
त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. अशा परिस्थितीत त्यांना दिल्लीतील एम्समधील व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. गेल्या शनिवारी प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
काँग्रेस नेते आणि सुखराम शर्मा यांचे नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आजोबांच्या निधनाची माहिती दिली होती. ‘गुडबाय आजोबा, फोन अजून वाजणार नाही.’, असं मंगळवारी रात्री त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं. आश्रय शर्मा यांनी आजोबांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
कुटुंबीयांकडून दिलेल्या माहितीनुसार, आज पंडित सुखराम यांचं पार्थिव दिल्लीहून हिमाचल प्रदेश येथील मंडीमध्ये आणलं जाणार आहे. सलापड, सुंदरनगर, नाचन आणि बाल्हसह मंडी सदरमध्ये पंडित सुखराम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहतील. उद्या सकाळी 11 वाजता पंडित सुखराम यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मंडी शहरातील ऐतिहासिक सेरी व्यासपीठावर ठेवण्यात येणार असून, त्यानंतर हनुमानघाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.