नांदगावातील पुलाच्या रेलिंगचे काम सुरू
कराड (अभयकुमार देशमुख) :
पुराच्या तडाख्याने नांदगाव ता. कराड येथील दक्षिण मांड नदीवरील धरण वजा पुलाचे रेलिंग तुटून वाहून गेले होते. त्यामुळे पुलावरून ये-जा करणे, वाहतूक करणे धोकादायक बनले होते. याबाबत पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर दोन दिवसापासून नवे रेलिंग बसवण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
नांदगाव( ता. कराड) येथील दक्षिण मांड नदीवर कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून व दिवंगत यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले यांच्या पुढाकारातून धरणवजा पूल बांधण्यात आला. त्याचे बांधकाम आजही मजबूत आहे .पण चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टी व त्यामुळे आलेल्या पुराने या पुलावरून प्रथमच पाणी गेले. परिणामी गावातही पाणी घुसले तर पूर ओसरल्यानंतर पुलाच्या संरक्षणासाठी उभारलेले लोखंडी ग्रील तुटून वाहून गेल्याचे समोर आले.
लोखंडी ग्रील वाहून गेल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले. तरीदेखील जीव मुठीत घेऊन वाहतूक सुरूच होती. स्थानिक लोक तसेच चालत जात होते. काही दिवसापूर्वी पुलावरुन चालत असताना खाली पडून गावातील एका व्यक्तीचा मृत्यू ही झाला आहे.
दरम्यान पुलाचे रेलिंग नव्याने उभारण्यात यावे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.तु. सुकरे गुरुजी यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, वसंत माटेकर, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कोडोले, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते आदींनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अनिल पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही याकामी मदत झाली आहे. त्याला यश येऊन निधी मंजूर झाला.
सुमारे 15 दिवसापूर्वी अधिकारी, ठेकेदार यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांच्यासमवेत प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत या पुलाची पाहणी केली होती. शुक्रवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यामुळे ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.