पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
आज जगभरातले अनेक देश कठीण काळातून जात आहेत. अशात आपला देश प्रगतीपथावर आहे सगळ्या जगात आपला देश चांगली कामगिरी करतो आहे. मात्र काही निराशावादी लोक हे आजही निराशेतच बुडाले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक होतं अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
२००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. या दहा वर्षात महागाई डबल डिजिट झाली. त्यामुळेच काही चांगलं झालं की या लोकांची निराशा वाढते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली होती त्यांनी फक्त त्यासाठीचे कायदे तयार केले. बाकी काहीही केलं नाही. आम्ही बेरोजगारी दूर करण्यासाठी कायदा केला एवढं सांगितलं. २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं घोटाळ्यांचं दशक होतं.
यूपीएची ती दहा वर्षे काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. अनोळखी वस्तूला हात लावू नका, आज इकडे स्फोट झाला, आज तिकडे स्फोट झाल्या अशाच बातम्या आल्या. २००४ ते २०१४ या कालावधीत हिंसाचाराचा कहर देशात माजला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला होता. यांच्या निराशेचं कारण हे देखील आहे की आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो आहे तेव्हा यांना वाईट वाटतं आहे.
आपला देश आधीही सामर्थ्यशाली होता. मात्र २००४ ते २०१४ हे दशक हे अत्यंत वाईट दशक होतं. प्रत्येक संधीला संकटात नेणारा तो काळ होता. टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे टूजी मध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले. भारताचं नाव या CWG घोटाळ्यांमुळे बदनाम झालं. जगात भारताची अब्रू गेली असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.