‘नितीश कुमारांना काही लाज वाटत नाही’
लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून मोदींचा हल्लाबोल
गुना (मध्य प्रदेश) :
बिहार विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संपूर्ण देशात राजकारण तापलं आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील गुना येथे सभेला संबोधित करताना त्यांनी नितीश कुमार यांच्यासह संपूर्ण ‘इंडिया’ आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी :
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुना येथे एका सभेला संबोधित करत होते. मोदी नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर म्हणाले, ‘जो नेता इंडिया आघाडीचा झेंडा घेऊन फिरत आहे, जो सध्याची सत्ता उलथून टाकण्याची योजना आखत आहेत, त्या नेत्यानं भर विधानसभेत अशा अश्लील गोष्टी बोलल्या. तेव्हा तेथे आई-बहीणीही उपस्थित होत्या. अशा असभ्य भाषेची कोणी कल्पनाही करू शकत नाही. यांना काही लाज वाटत नाही’, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.
काय आहे प्रकरण :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ७ नोव्हेंबर रोजी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलताना अत्यंत बेताल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी नितीश कुमारांना विवेकहीन म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘नितीश कुमार यांची बुद्धी भ्रष्ट झाली, त्यांनी संपूर्ण मातृशक्तीचा अनादर केला’, असं अश्विनी चौबे म्हणाले.
या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर नितीश कुमारांनी मंगळवारी माफी मागितली. ‘माझ्या वक्तव्यानं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही महिलांच्या उत्थानासाठी सातत्यानं काम करत आहोत, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या वक्तव्याचा बचाव केला आहे. ‘मुख्यमंत्री फक्त लैंगिक शिक्षणावर बोलत होते. त्यांच्या वक्तव्याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही, असं तेजस्वी यादव म्हणाले.