घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यात गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्नूकर खेळाडूचाही समावेश आहे. या दोघांचाही घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्नूकर खेळाडूने नुकतेच नॅशनल गेम्समध्ये भाग घेतला होता. या स्नूकर खेळाडूने नुकतेच नॅशनल गेम्समध्ये भाग घेतला होता. स्नूकरपटू सुलेमान शेख आणि त्याचा साथीदार शब्बीरसाहेब शालावाडी यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर घरफोडी आणि वाहन चोरीचा आरोप आहे.
सुलेमान शेखने 2023 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते. दोघांनाही कॅसिनोचे व्यसन होते, त्यामुळे त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
संशयित आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरुद्ध उत्तर गोव्यातील पर्वरी येथे दोन घरफोडी, म्हापसा आणि मार्दोळ येथे प्रत्येकी एक आणि दक्षिण गोव्यातील मडगाव येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या ताब्यातून 17 लाख रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना पकडण्यासाठी किमान 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले, त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.