मोदींनी केले नव्या संसदेचे लोकार्पण
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात. आज तो क्षण आहे. आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. याच काळात आपल्याला आपली नवी संसद मिळाली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. आज सकाळी संसद भवन परिसरात सर्व पंथांच्या प्रार्थना झाल्या आहे. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारं मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारी कडी सिद्ध होईल.
पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले, नवीन संसद भवन आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संकल्पना साकार करत आहे. ही नवी संसद आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाची साक्षीदार होईल. विकसित भारताच्या संकल्पांची सिद्धी होताना पाहील. नूतन आणि पुरातनाच्या सहअस्तित्वाचा आदर्श बनेल. भारत जेव्हा विकास करतो, पुढे जातो, तेव्हा हे विश्वदेखील पुढे सरकतं.