आज मध्यरात्रीपासून खुला होणार झुआरी पूल
मडगाव:
बहुचर्चित झुआरी नदीवरील नवा केबल स्टेट पूल उद्घाटनानंतर आज गुरुवारी मध्यरात्रीपासून खुला केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. झुआरी पूल सुरु झाल्यामुळे पणजी-मडगाव मार्गावरील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल बुधवारी मंत्री, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते यांची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, झुआरी पुलाचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. मात्र, लोकांसाठी हा पूल सायंकाळी 4 वाजल्यापासून खुला असेल. नागरिकांना प्रत्यक्ष पुलावर चालण्याची ही शेवटची संधी असेल. उद्घाटन झाल्यानंतर पुलावरचे सर्व साहित्य हटवण्यात येईल आणि रात्री बारानंतर हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
मुख्यमंत्री सावंत दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या संदर्भात ते म्हणाले, की राज्यातील केंद्रीय प्रकल्पांसाठी 60-40 टक्के अशी तरतूद आहे. 60 टक्के खर्च हा केंद्र सरकार करते. तर 40 टक्के खर्च राज्य सरकारला भरावा लागतो. मात्र, गोवा उशिरा मुक्त झाल्याने पहिल्या दोन वित्त आयोगाचा लाभ राज्याला मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात राबवल्या जाणाऱ्या केंद्रीय योजनांसाठी 90 टक्के खर्च केंद्राने करावा आणि 10 टक्के खर्च राज्य सरकार करेल, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
दुसरीकडे राज्यातील खासगी बसेससाठी 26 जानेवारीला विशेष योजना जाहीर होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर टॅक्सी ॲप 5 जानेवारीपासून सुरू होईल. आतापर्यंत 650 पेक्षा अधिक व्यावसायिकांनी ॲपसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.