‘चिखल काला नाही हो, चिखल झाला’
पणजी :
चिखल काला नाही हो, चिखल झाला. पहिल्याच पावसात, गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत अंतर्गत केलेल्या चिखलमय विकासाचे दर्शन घडवणाऱ्या भाजपच्या इमॅजिन पणजीचे अभिनंदन.कोटी कोटी खर्च करून केलेला भाजपचा हा विकास आहे, अशी टीका करत कॉंग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी भाजप सरकारचा निषेध केला. पणजीत आज सकाळी आलेल्या पूरावर त्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली.
मी भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारत अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी पणजीमध्ये हाती घेतलेल्या स्मार्ट कामांचे साक्षीदार होण्यासाठी सर्व कदंबा बसेस वापरून काणकोण ते पेडणे आणि मुरगाव ते मोलेंपर्यंतच्या गोमतकीयांना पणजीत आणून त्यांना भाजपच्या विकासाचा महापूर दाखवा, असा जबरदस्त टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी “पिक्चर अभी बाकी है! हा फक्त गोव्यातील राजधानी पणजीत स्मार्ट सिटी आणि भाजप सरकारच्या अमृत मिशन अंतर्गत सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या विकासाचा ट्रेलर आहे. हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इमेजीन पणजी आणि भाजपने हाती घेतलेला विकसीत भारत आहे, अशी बोचरी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारतचा गोव्याच्या राजधानी शहरामध्ये हा स्मार्ट विकास आहे. पणजी निवासी भाजपची दक्षिण गोव्यातील उमेदवार मोदींच्या या विकासाबद्दल बोलत आहेत. दक्षिण गोव्यात हा विकास होऊ देऊ नका. या सर्वांना दूर ठेवूया, असे काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.
पहिल्याच पावसात आज पुन्हा एकदा पणजीत पूर आल्याने अनेक दुकानांमध्ये पाणि शिरले. सांतइनेज, भाटले, टोंका येथे सगळीकडे चिखल साचला होता. सदर भागात अजूनही नाले, गटारे बांधण्याची कामे सुरू आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काही पूरग्रस्त भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.