भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या 15 जणांना फाशी
भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने पीएफआयशी संबंधित 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
डिसेंबर 2021 मध्ये, अलाप्पुझा जिल्ह्यात भाजप ओबीसी विंगचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मावेलिक्कारा व्ही.जी. श्रीदेवी यांनी मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. याबाबत पीएफआयचे हे सदस्य ‘ट्रेंड किलर स्क्वॉड’शी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. पीडितेची आई, मूल आणि पत्नी यांच्यासमोर ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली, ते दुर्मिळ गुन्ह्यांच्या श्रेणीत येते, असे वकिलांनी म्हटले होते.
रिपोर्टनुसार, भाजप नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (SDPI) शी संबंधित कार्यकर्त्यांचा हात होता. 19 डिसेंबर 2021 रोजी या लोकांनी रणजीत यांना बेदम मारहाण करुन घरातच कुटुंबासमोर त्यांची हत्या केली होती. विशेष वकिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा उद्देश श्रीनिवासन यांना पळून जाण्यापासून रोखणे आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून कोणालाही घरात प्रवेश करण्यापासून रोखणे हा होता.
यापूर्वी, 20 जानेवारी रोजी न्यायालयाने या प्रकरणी सर्व 15 जणांना दोषी ठरवून 30 जानेवारीपर्यंत निकाल पुढे ढकलला होता. विशेष वकिल प्रताप जी पडिक्कल यांच्या म्हणण्यानुसार, 15 आरोपींपैकी 1 ते 8 आरोपी या प्रकरणात थेट सहभागी असल्याचे न्यायालयाला आढळून आले. न्यायालयाने 4 आरोपींना (आरोपी क्रमांक 9 ते 12) हत्येसाठी दोषी ठरवले. कारण ते थेट गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांसोबत होते आणि प्राणघातक शस्त्रांसह घटनास्थळी पोहोचले होते.