मीरा यांना ‘शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार’ प्रदान
प्रसिध्द गोमंतकीय कवयित्री आणि लेखिका मीरा यांना नुकताच शांता शेळके साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शांता शेळके यांच्या जन्मगावी, मंचर येथे आयोजित या कार्यक्रमाला जेष्ठ साहित्यिक गंगाधर बनबेरे, साहित्यिक नितीन चंदनशिवे, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील बांगर आदी मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
शांता शेळके यांचे महाराष्ट्रातील मंचर हे जन्मगाव. येथील शांता शेळके प्रंतिष्ठान साहित्य, कला, संस्कृती मंच प्रतिवर्षी लेखकांना साहित्य पुरस्कार देऊन गौरव करत असते. कथा, कादंबरी, अनुवाद, ललितलेख, कविता अशा विविध साहित्य प्रकारांना हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी मीरा यांच्या ‘ऐक द्रौपदी’ या दीर्घकाव्याची निवड करण्यात आली होती. याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार व विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कारही मिळाले आहेत. सहित प्रकाशनच्यावतीने या काव्यसंग्रहाचा कोंकणी अनुवाद देखील प्रकाशित झाला आहे.