‘नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नाही’
पणजी:
गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी बागा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला दिलेल्या परवानगीच्या वैधतेची कोणतीही नोंद त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट केल्याने भाजप सरकारची लोकांच्या आरोग्याबाबत आणि मत्स्य जीवांबाबतची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्याही वैज्ञानिक प्रक्रियेशिवाय सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांडपाणी प्रकल्प आणि सांडपाणी टँकरच्या मर्जीवर सोडली आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी केला आहे.
आज अमरनाथ पणजीकर, लॉरेंसो सिल्व्हेरा, विवेक डिसिल्वा , एव्हरसन वालीस, वीरेंद्र शिरोडकर, विजय भिके, मुक्तमाला शिरोडकर, अतुल नाईक, जॉन नाझारेथ, प्रणव परब, सोनल मालवणकर, रामकृष्ण जल्मी, राजन कोरगावकर आणि इतरांचा समावेश असलेल्या काँग्रेस शिष्टमंडळाने गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळ अध्यक्षांची भेट घेऊन बागा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या बागा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
गोव्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर तसेच सांडपाणी वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच सांडपाणी टँकर यांनी अवलंबलेल्या पद्धतीबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळ अनभिज्ञ आहे. दूषीतवसांडपाणी सोडले जात असल्याने आमच्या नद्या आणि भातशेती प्रदूषित झाल्या आहेत, असे काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.
बागा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प “कंसेंट टू ऑपरेट” संमतीशिवाय कार्यरत आहे. विविध तक्रारी करूनही गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. सदर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने बंद करावा अशी आमची मागणी आहे, अशी मागणी युवक काँग्रेसचे नेते विवेक डिसिल्वा यांनी केली.
सांडपाण्याच्या टँकरच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष विविध सरकारी विभागांच्या विरोधात मैदानात उतरला आहे. आम्ही इथेच थांबणार नाही आणि जोपर्यंत सरकारकडून सांडपाण्याची वैज्ञानीक पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असे लोरेंसो सिल्वेरा यांनी सांगितले.