पर्वरी रायझिंगतर्फे वनमहोत्सव साजरा
वन्यसंपदा मातीची धूप रोखतानाच जलसंवर्धनाचे महत्वाचे कार्य करते. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मातीची धूप रोखणे, जलसंवर्धन आणि त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण सांभाळण्यासाठी मदत होणार आहे. भूगर्भातील जल पातळी सांभाळण्यासाठी वनीकरणाची मोठी मदत होणार असून त्याचसाठी ही पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पना राबविण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन अ. खंवटे यांनी आज पर्वरी येथे दिली.
पर्वरी रायझिंगच्या “पाणी अडवा, पाणी जिरवा” या उपक्रमाखाली आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक तसेच पेन्ह द फ्रांकचे सरपंच सपनील चोडणकर, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, साल्वादोर द मुंदचे माजी सरपंच व विद्यमान पंच संदीप साळगांवकर तसेच पेन्ह द फ्रांक, सुकूर व साल्वादोर द मुंदचे पंचसदस्य यावेळी उपस्थित होते.
“पाणी अडवा, पाणी जिरवा”च्या साथीत सामाजिक वनीकरणाची सांगड घातल्यास पर्यावरणाचा समतोल राखता येईल. हे उपक्रम पाणी उपलब्धतेची समस्या सोडवण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे असल्याचे खंवटे पुढे बोलताना म्हणाले. समाजाला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी पर्वरी रायझिंगतर्फे आज पर्वरीतील तिन्ही पंचायत क्षेत्रात तीन ठिकाणी वनमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पेन्ह द फ्रांक पंचायत क्षेत्रातील कार्यक्रम सायन्स पार्क येथे तर सुकूर पंचायतीच्या वाहन पार्कींग आवारात दुसरा कार्यक्रम झाला. साल्वादोर द मुंद पंचायत क्षेत्रातील कार्यक्रम संजय नगर येथील वेताळ महारूद्र मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.
वृक्षारोपणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यास मदत होईल. वातावरणात ऑक्सिजनची वाढ होईल आणि हवेतील प्रदूषण कमी होईल. वनीकरणामुळे विविध प्राण्यांना निवासस्थान मिळेल, ज्यामुळे जैव विविधताही वाढेल. हे जैव वैविध्य टिकवून ठेवल्यामुळे पोषण साखळीचे संतुलन राखता येईल. नजीकच्या काळात पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना राज्यभरात नेण्याचा आमचा प्रयत्न असेल जेणेकरून वनीकरण आणि जलसंवर्धनाच्या प्रकल्पांमुळे राज्याच्या ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे खंवटे यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात लोकसहभाग नितांत आवश्यक असून त्यातून लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढेल. “पाणी अडवा, पाणी जिरवा” आणि वनीकरणामुळे पर्यावरणीय संतुलन राखतानाच दीर्घकालीन शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले. गोव्याचे पर्यटन खुलविण्यासाठी देखील सामाजिक वनीकरण अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खंवटे यांच्याहस्ते वनमहोत्सवांतर्गत उपस्थितांना रोपवाटीकांचे वाटप करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम यशस्वी व्हावा या हेतूने रोपवाटीकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच सपनील चोड़णकर यांनी दिली. सामाजिक वनीकरणाचे महत्व समाजाला पटावे व वनसंपदा व जल संवर्धन मानवी जीवनात किती महत्वाचे आहे हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.