
ब्लॅक स्पॉट इव्हेटचा निषेध : प्रभव नायक
मडगाव : धोकादायक रस्त्यांच्या परिस्थितीमुळे निरपराध नागरिकांचे बळी गेलेल्या ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी जीवितहानी झालेली असताना दोष स्वीकारण्याऐवजी दुरुस्ती कामाला सुरूवात करताना इव्हेंट आयोजित करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे. पेडणे येथे आयोजित कार्यक्रमावर कठोर टिका करताना मडगावचो आवाजने सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी अपघाती मृत्यूच्या सापळ्यांबाबत जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित होते असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक ब्लॅक स्पॉट हा प्रशासनाच्या गंभीर अपयशाचे प्रतीक आहे आणि वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर अनेक कुटुंबांचे अपरिमित नुकसान टळले असते. एकाच ठिकाणी वारंवार अपघात होणे ही योगायोगाची बाब नसून ती प्रशासनाची उदासीनता आणि विलंबित कारवाई दर्शवते,” असे प्रभाव नायक यांनी स्पष्ट केले.
“पायाभरणी कार्यक्रमाचा खरा हेतू काय, हा मोठा प्रश्न आहे. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कमिशनखोरीसाठी हे कार्यक्रम रचले जात आहेत काय? गोव्याच्या जनतेला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे की ही कामे खरोखर सुरक्षेसाठी होत आहेत की काही स्वार्थी हितसंबंधांसाठी,” असा सरळ प्रश्न प्रभव नायक यांनी विचारला आहे.
“जर सरकार खरोखरच रस्ता सुरक्षेबाबत कटिबद्ध असते, तर अपघातप्रवण ठिकाणे घोषित होताच तातडीने उपाययोजना केल्या असत्या. मात्र सध्या दिसणारी हालचाल ही उशिरा आणि सोयीस्कर वेळ साधून केली जात असल्याने आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात आहे, अशी शंका निर्माण होते,” असा दावा त्यांनी केला.
प्रभव नायक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या कथित ७५ लाखांच्या गणेश मंडप घोटाळ्यावरील मौनाबाबत तसेच मडगाव रिंगरोडवरील वादग्रस्त “इंच-बाय-इंच झिग-झॅग रोलर कोस्टर” गटाराच्या कामाबाबतही प्रश्न उपस्थित केले. आर्थिक गैरव्यवहारांच्या गंभीर आरोपांवर पारदर्शक स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.



