
गोव्यातील बेरोजगारीकडे प्रभव नायक यांनी वेधले पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष
मडगाव : मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून भारताचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) यांना टॅग करत गोव्यातील वाढत्या बेरोजगारीच्या संकटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कांपाल येथील आरोग्य संचालनालयाच्या बाहेर हजारो पात्र युवक व युवती केवळ १०० कंत्राटी नर्सिंग पदांसाठी रांगेत उभे असल्याचा उल्लेख करत नायक म्हणाले, “ही दृश्ये केवळ हताशतेचे प्रतीक नाहीत, तर संधी, सन्मान व उत्तरदायित्वासाठी दिलेला सामूहिक आक्रोश आहे.”
“हे फक्त नोकरीसाठी आलेले उमेदवार नाहीत. ते त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत. पदवी, अनुभव आणि भविष्याचे स्वप्न उराशी बाळगलेली ही तरुण मंडळी, कर्जाच्या हफ्त्यांखाली दबलेल्या तसेच वृद्ध पालकांची जबाबदारी साभाळत, सन्मान व स्थैर्य नसलेल्या तात्पुरत्या नोकऱ्यांसाठी धावपळ करत आहेत,” असे प्रभव नायक म्हणाले. हे दृश्य, “गोव्याच्या युवकांना सातत्याने दावलणाऱ्या व्यवस्थेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे,” असेही ते म्हणाले.
या भरती प्रक्रियेतील निष्काळजीपणाही आता चर्चेचा विषय ठरत आहे. कोणतेही स्पष्ट वेळापत्रक नाही, योग्य नियोजन नाही आणि गर्दीवर नियंत्रण तर नाहीच. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अर्जदारांनी लावलेल्या अंतहीन रांगा हे प्रशासनाच्या युवकांप्रती असलेल्या उदासीनतेचे उघड उदाहरण आहे, असा आरोप प्रभव नायक यांनी केला.
प्रभव नायक यांनी सरकारला विचारले आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीसाठी कर्मचारी निवड आयोग (एसएससी) चा वापर का करण्यात आलेला नाही? “जर हजारो गोमंतकीय युवक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करत असतील, तर अशा भरतीसाठी कायदेशीर भरती संस्था असताना ती वापरण्यात का आली नाही? एवढ्या महत्त्वाच्या निवडी हे सरकार अनियमित आणि मनमानी पद्धतीने का करत आहे?” असा सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला.
इतक्या मोठ्या संख्येने अर्जदार एका दिवसात हजर असताना मुलाखती कशा पार पडणार? त्या न्याय्य आणि पारदर्शक असतील का? “ही निवड प्रक्रिया खरंच प्रामाणिक आहे का, की केवळ औपचारिकता म्हणून केली जात आहे?” असा प्रश्नही नायक यांनी उपस्थित केला. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त एक दिखावा ठरू नये, अशी भूमिका प्रभव नायक यांनी मांडली आहे.
प्रभव नायक यांनी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांकडे, गोव्यातील बेरोजगारीच्या या गंभीर स्थितीकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. “गोव्याच्या युवकांना तात्पुरत्या नोकऱ्यांपलीकडे काहीतरी हवे आहे. त्यांना भविष्य हवे आहे, आणि एक अशी व्यवस्था हवी आहे जी त्यांच्या पात्रता, मेहनत आणि स्वप्नांचा आदर करते,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.