प्रतापगडाला कडप्पाचा आधार; ‘ही हुशारी कोणाची?’
सातारा (महेश पवार) :
इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने लोकवर्गणीतून डागडुजीचे काम सुरू आहे. हे काम करत असताना ठेकेदाराकडून किल्ल्याच्या तटबंदीला कडाप्पा लावला जात असून शिवकालीन किल्ल्याचा इतिहास मिटवण्याचा प्रकार समोर आहे.
ग्रामस्थांनी या कामावर आक्षेप घेतला असून वर्ल्ड हेरिटेज असलेल्या प्रतापगडाचे चुकीच्या पद्धतीने आणि मनमानी पद्धतीने चालू असलेले काम बंद करण्याची मागणी शिवप्रेमींमधून होत आहे. तसेच संबंधित कामाला परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत ठेकेदारास सुरू असलेल्या कामाबाबत विचारले असता, सदर काम हे परवानगीने सुरू असल्याचे सांगितले. शिवरायांच्या ऐतिहासिक हेरिटेज वास्तू असलेल्या किल्याच्या तटबंदीला कडाप्पा लावण्याची परवानगी देणारे अतिहुशार इंजिनिअर आणि अभियंते नेमके कोण आहेत, हे समोर आलेच पाहिजे, असा पवित्रा शिवप्रेमींनी घेतला आहे.