श्रद्धानंद विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मडगाव:
सोमवार, १२ ऑगस्ट रोजी पैंगीण, काणकोण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात कुमुदिनी कवळेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोवा मुक्तीलढ्यात महिला म्हणून महत्त्वाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानी स्व. कुमुदिनी दामोदर कवळेकर या पैंगीण येथील कन्या असून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धानंद ज्ञानप्रसारक संस्थेकडे कायम निधी ठेवला आहे. गेली वीस वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी काणकोण तालुक्यातील एकूण १५ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मुकुल पै रायतूरकर यांच्या हस्ते स्व. कुमुदिनी कवळेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार बहाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ‘गोवा मुक्तिलढ्यात सहभागी झालेले काणकोण तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक’ हा सदर प्रश्नमंजुषेचा विषय होता. त्यानिमित्ताने काणकोण तालुक्यात होऊन गेलेल्या स्वांत्र्यसैनिकांबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा एकाच उद्देश त्यामागे होता. . सर्वप्रथम लेखी परीक्षा घेऊन अंतिम फेरीसाठी ५ गटांची निवड करण्यात आली. श्री श्रद्धानंद विद्यालय-पैंगीण, श्री निराकार विद्यालय – माशें, श्री मल्लिकार्जुन विद्यालय चार-रस्ता, बलराम निवासी विद्यालय – आमोणे, सरकारी विद्यालय-श्रीस्थळ या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये अंतिम फेरी पार पडली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेंनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. मुकुल पै रायतूरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पैंगणकर, ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश प्रभुगावकर, मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर, स्व. कुमुदिनी कवळेकर यांचे कुटुंबीय अचला प्रभू, सुचिता कामत, हेमंत कवळेकर आदी उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तर विद्यार्थी प्रतिनिधी कु. साहिल गोसावी याने पाहुण्यांचे फुलांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्व. कुमुदिनी कवळेकरांनी गोवा मुक्तीलढ्यात सहभाग घेऊन कशाप्रकारे तुरुंगवास भोगला होता याबद्दल सांगितले.
माशें येथील निराकार विद्यालयाच्ये विद्यार्थी कु. विभूती विरेश भैरेली आणि कु. पार्थ दिनेश नाईक यांनी प्रथम पारितोषक पटकाविले, तर कु. शिनिधी रमेश गावकर व कु. अश्वेक अशोक गावकर – बलराम निवासी विद्यालय-आमोणे यांनी द्वितीय आणि कु. स्वतेज विनय भगत व कु. वैष्णवी दत्तराज कोमरपंत – श्री मल्लिकार्जुन विद्यालय- चाररस्ता यांनी तृतीय पारितोषक पटकावले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आणि बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक आणि रोख रक्कम देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लुईझा फर्नांडिस यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रश्नमंजुषेचे संयोजक, शिक्षक सागर वेळीप यांनी केले. पसायदानाने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.