‘मडगांवचो आवाज’तर्फे १ नोव्हेंबरला “रिमेंबरिंग पात्रांव” श्रद्धांजली कार्यक्रम
मडगाव: मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांच्या पुढाकाराने “रिमेंबरिंग पात्रांव” हा विशेष स्मृतिपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, तो शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियममधील इम्पीरियल हॉल, मडगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमातून माजी मुख्यमंत्री व लोकनेते रवी सिताराम नाईक, यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे.
“माजी मुख्यमंत्री रवी सिताराम नाईक यांच्या परिवाराशी चर्चा करून आम्ही या स्मृतिपर कार्यक्रमासाठी त्यांची संमती घेतली आहे. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.
आदरणीय रवी नाईक यांचे सर्व सहकारी, सहकर्मी, हितचींतक तसेच रवी नाईक यांच्या सार्वजनिक जीवनात जवळून काम केलेल्या सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभव नायक यांनी केले आहे. “हा कार्यक्रम रवी नाईक यांच्या जीवनकार्याचा, विचारांचा आणि लोकसेवेच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आहे,” असे नायक म्हणाले.
रवी नाईक, ज्यांना प्रेमाने ‘पात्रांव’ म्हणून ओळखले जायचे, हे त्यांच्या साधेपणा तसेच कणखर नेतृत्व, लोकांपर्यंत सहज पोहोचण्याची वृत्ती आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्यामुळे सर्व पिढ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचे नेतृत्व नेहमीच नम्रता आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठीच्या निष्ठेने परिभाषित झाले, असे प्रभव नायक म्हणाले.
रवी सिताराम नाईक हे फक्त एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर गोव्याच्या आत्म्याशी एकरूप झालेले जननेते होते. त्यांची करुणा आणि लोकसेवा आजही आम्हा सर्वांना सार्वजनिक हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
मडगांवचो आवाजतर्फे सर्व नागरिकांना ‘रिमेंबरींग पात्रांव’ कार्यक्रमात सहभागी होवून आदरणीय रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

