मडगाव:
अभिमानी मडगावकर आणि प्रख्यात सिनेमॅटोग्राफर के. अतिश उर्फ अतिश कुंकळ्येकर यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ८ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. हे वर्ष त्यांचे वडील आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना इफ्फी-२०२४ मध्ये कुंकळ्येकर पिता-पुत्रांना विशेष आदरांजली देऊन सन्मानित करण्याची विनंती करतो, असे युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
मडगाव येथील कुंकळ्येकर कुटुंबातील सिनेमॅटोग्राफर पिता-पुत्राचे स्मरण करताना, प्रभव नायक यांनी के.वैकुंठ व के. अतिश यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाने गोव्याचे नाव उज्वल झाल्याचे सांगितले.
२५ ऑगस्ट १९२५ रोजी मडगाव येथे जन्मलेल्या के. वैकुंठ यांचा सन्मान करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. “सीता और गीता” या चित्रपटासाठी त्यांना सिनेमॅटोग्राफीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पोट्रेट्स बनवण्यातही त्यांचा हातखंडा होता. त्यांनी अनेक चित्रपट निर्मात्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेण्याची गरज आहे, असे मत प्रभव नायक यांनी व्यक्त केले.
के. आतिश उर्फ अतिश कुंकळ्येकर यांनी “बुगी वूगी” या नृत्य कार्यक्रमाची सिनेमॅटोग्राफी करुन स्वतःचे नाव कमावले. “सा रे ग म पा” या लोकप्रिय गायन स्पर्धेसाठी ते सिनेमॅटोग्राफर होते. सिनेमॅटोग्राफर म्हणून ते विविध चित्रपटांशी जोडले गेले होते, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माझी सूचना स्वीकारतील आणि आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान या दोन महान कलाकारांची आठवण ठेवून त्यांना योग्य सन्मान देतील, असा विश्वास प्रभव नायक यांनी व्यक्त केली.
गोव्याने चित्रपट, नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला इत्यादींसह विविध कला क्षेत्रात अनेक रत्ने दिली आहेत. आपण त्यांचे स्मरण ठेवून त्यांची जयंती व पुण्यतिथी तसेच इतर महत्वांच्या दिवशी महान गोमंतकीयांना आदरांजली दिली पाहिजे, असे प्रभव नायक म्हणाले.