‘म्हणून’ काँग्रेस आमदारांनी परिधान केले काळे कपडे
पणजी :
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेसचे हळदोणाचे आमदार अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा आणि केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या अपात्रतेच्या निषेधार्थ काळे कपडे परिधान करून गोवा विधानसभेत आले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी एकता, अखंडता, शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारी आणि बेरोजगारी आणि महागाईवरील लोकांच्या तक्रारी ऐकून घेत कन्याकुमारी ते काश्मीर अशी “भारत जोडो यात्रा” यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राहुल गांधींचे अभिनंदन करणारा एक अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सभापतींनी नामंजूर केला.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच सभापतीनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला तेव्हा युरी आलेमाव यांनी देशाला एकसंध ठेवण्याच्या ध्येयाने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 4000 किलोमीटर चालणे गुन्हा आहे का? असा सवाल करुन सभापतींकडे निषेध नोंदवीला. केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनीही सभापतीना प्रस्ताव दाखल करुन घेण्याची विनंती केली.
सत्य बोलणारे आणि भाजप सरकारचा क्रोनी कॅपिटलिस्ट अजेंडा उघड करणारे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. निषेधाचे प्रतीक म्हणून आम्ही तिघांनीही आज काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हळदोणचे आमदार अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा आणि केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनीही अपात्रतेचा निषेध केला आणि राहुल गांधी यांच्या अभिनंदन प्रस्तावाला सभापतींनी परवानगी न दिल्याबद्दल संताप व्यक्त केला. या सरकारला लोकशाही संपवायची आहे, असे ते म्हणाले.