‘रवी नाईक हे निश्चयाचा महामेरू’; मडगांवचो आवाजतर्फे आयोजित श्रद्धांजली
मडगाव : गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. रवी सीताराम नाईक यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी, १ नोव्हेंबर २०२५ रोजी “रिमेंबरिंग पात्रांव” या शीर्षकाखाली मडगाव येथे स्मरणसभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांना “निश्चयाचा महानेरू” म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दृढनिश्चय, धैर्य आणि करुणा यांचे प्रतीक असलेले असे व्यक्तिमत्त्व, जे आपल्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात गोमंतकीय जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहिले असे उद्गार वक्त्यांनी काढले.
या प्रसंगी मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी रवी नाईक यांच्या नेतृत्वशैलीची आठवण करून दिली. “ते कृतीवर विश्वास ठेवत, घोषणांवर नव्हे. त्यांचे शब्द हे वचनासारखे असत, आणि वचन म्हणजे त्यांचे ध्येय,” असे सांगत त्यांनी त्यांना “जनतेचा खरा चॅम्पियन” म्हटले.
भंडारी समाजाचे नेते संजीव नाईक यांनी रवी नाईक यांच्या साधेपणाची आणि मार्गदर्शनाची भावनिक आठवण सांगितली. “माझ्यासाठी ते फक्त ‘पात्रांव’ नव्हते, तर मित्र आणि गुरु होते. त्यांनी एकटे असलात तरी सत्यासाठी उभे राहणे हिच खरी असल्याचे शिकवीले ताकद म्हणजे” असे ते म्हणाले.

प्रा. रामराव वाघ यांनी रवी नाईक यांच्या युवकांप्रती असलेल्या दृष्टीकोनाबद्दल बोलताना सांगितले, “माझा भाऊ, स्व. विष्णू सुर्या वाघ, आणि रवी नाईक यांच्यात मतभेद असायचे, पण एकमेकांबद्दल सन्मान व आदर कायम होता. रवी नाईक मानायचे की गोव्याची ताकद शिक्षणात आणि स्वावलंबनात आहे. त्यांचा राजकीय प्रवास संपला असला तरी त्यांच्या विचारांची दिशा आजही आम्हाला मार्गदर्शन करते.”
या स्मरणसभेत विनोद शिरोडकर, प्रदीप नाईक, रोहिदास नाईक, गुरुदास कामत, म्हाळू नाईक, योगेश नागवेंकर आणि दत्ताराज पै फोंडेकर यांनी रवी नाईक यांना आदरांजली वाहिली. त्यांनी रवी नाईक यांना निर्भय प्रशासक, जनतेचा नेता आणि सर्व समाजघटकांना जोडणारा “गोमंतकाचा सुपुत्र” म्हणून गौरविले.
वरिष्ठ पत्रकार अनिल पै यांनी रवी नाईक यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिण्याची गरज अधोरेखित केली. “रवी नाईक यांच्या जीवनप्रवासावरचे पुस्तक पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचा समारोप गोव्यासाठी रवी नाईक यांच्या निश्चय (दृढनिश्चय) आणि सेवा (समर्पण) या विचारसरणीला पुढे नेण्याच्या सामूहिक संकल्पाने झाला. एका वक्त्याने सांगितले “पात्रांव शारीरिकरित्या आपल्यात नसतील, पण त्यांचा साधेपणा, धैर्य आणि निश्चयाचा मार्ग गोव्याच्या वाटचालीला उजळत राहील.”
कार्यक्रमाला मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो, आर्थुर डिसिल्वा, नगरसेवक जाफर मोहम्मद, एम. के. शेख, डॉ. राजेंद्र सावर्डेकर, भाई नायक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


