बंगलोर :
भारतीय भाषांतील उत्कृष्ट अनुवादासाठी देण्यात येणाऱ्या साहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. यामध्ये कोंकणी भाषेतील अनुवादासाठी बंगलोरस्थित प्रसिद्ध साहित्यिका आणि अनुवादिका गीता शेणॉय यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये, साहित्य अकादमीचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मराठीसाठी दिवंगत अनुवादक कुमार नवाथे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.
गेल्या कित्येक वर्षांपासून कोंकणी साहित्यामध्ये कार्यरत असलेल्या गीता शेणॉय यांनी आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल ‘राष्ट्रमत’सोबत बोलताना विशेष आनंद व्यक्त केला. राष्ट्रकवी कुंवेंपु यांचे साहित्य बहुतांश भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. मात्र कोंकणी मध्ये त्यांचे साहित्य नव्हते. ‘बहुजिव्हा भारतीक ऐक्यताच्या आरती’ या अनुवादित पुस्तकाच्या माध्यमातून आता कोंकणी रसिकांना देखील कुंवेंपुचे साहित्य- विचार अनुभवता येणार आहेत. कन्नड सरकारने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकासोबत माझे विशेष ऋणानुबंध जोडले गेले होते. आणि आता याच पुस्तकाच्या निमित्ताने मला कोंकणीसाठीचा अनुवादाचा साहित्य अकादेमी पुरस्कार जाहीर झाल्याचे ऐकून खूप आनंद झाला आहे. अशा शब्दात गीता शेणॉय यांनी ‘राष्ट्रमत’कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.