”या’मुळे सुरु आहे सप्तकोटेश्वर मंदिरात गळती’
पणजी :
भाजप सरकारच्या ‘मिशन टोटल कमिशन’मुळे निकृष्ट काम होत असून त्याचे पडसाद सर्वत्र दिसत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर म्हणाले की, श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या छताची गळती ही सत्तेतील पक्षाच्या घोटाळ्यांची आणखी एक ’पावती’ आहे.
“श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरणावर ७.७ कोटी खर्च करून फेब्रुवारीमध्ये उद्घाटन करण्यात आले. आज त्याचे छत गळत आहे. या ‘मिशन टोटल कमिशन’ सरकारने केलेल्या निकृष्ट कामामुळेच असे होत आहे,” असे पणजीकर म्हणाले.
ते म्हणाले की, अलीकडेच कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचे छत याच कारणामुळे कथितपणे कोसळले. “कला अकादमी प्रकरणात भाजपने ‘कमिशन’साठी निविदा मागवण्याऐवजी कंत्राटदारांना प्रक्रिया न करता काम दिले. असे दिसते की त्यांनी मंदिरासारख्या धार्मिक स्थळांनाही सोडले नाही आणि कमिशनसाठी दर्जेदार कामाशी तडजोड केली आहे,” असे ते म्हणाले.
‘‘ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा सरकारचे अभिनंदन केले होते. “हिंदूच्या नांवावर मते मिळवणारा भाजप मंदिर जीर्णोद्धार सारख्या प्रकल्पातही भ्रष्टाचार करत आहे, हे खूप वाईट आहे. आता प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राज्यातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल जाब विचारावा,” असे ते म्हणाले.
पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण द्यावे. या प्रकल्पासाठी करदात्यांच्या पैशाचा वापर केला जात आहे आणि आता काम निकृष्ट असल्याचे आढळल्याने पैसे वाया जात आहे हे स्पष्ट झाले आहे,” असे पणजीकर म्हणाले.
“या प्रकरणाची चौकशी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, कारण नूतनीकरणापूर्वी छप्पर कधीही गळत नव्हते. असे दिसते की भाजपचे मंत्री नूतनीकरण प्रकल्पांवर पैसे कमवत आहेत आणि ते कधीही त्याची जबाबदारी घेत नाहीत, उलट ते दुसऱ्या खात्यांवर आरोप करताना दिसतातात,” असे ते म्हणाले.