अजब कायदा! ३०२ च्या गुन्ह्यातील आरोपी फिरताहेत उजळमाथ्याने…
सातारा (महेश पवार) :
नागठाणे येथील नीलम बेंद्रे अन्याय प्रकरणात कलम ३०२ नुसार गुन्हे दाखल झाल्यानंतरही डॉक्टर, नर्स व कंपाऊंडर हे चारही आरोपी उजळमाथ्याने फिरत आहेत. धनाढ्य वर्गातील असल्याने आरोपींचा हात थेट वरपर्यंत पोहोचला असून मंत्रालय पातळीवरील दबावापुढे ‘पडे रहो” ची भूमिका घेतलेल्या पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नाही. सर्वसामान्यांसाठी वेगळा आणि धनाढ्य वर्गातील आरोपींसाठी वेगळा कायदा आहे काय, अशी संतप्त भावना जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करु लागले आहेत.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी, नागठाणे, ता. सातारा येथील नीलम बेंद्रे या महिलेच्या प्रसूती वेळी घाडगे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने तिचे बाळ दगावले असल्याचा आरोप करीत बेंद्रे कुटुंबियांनी बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी याप्रकरणी घाडगे हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्टर, नर्स व कंपाउंडर अशा चार संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले होते. दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुढच्या सुनावणी दरम्यान आरोपींची जामीनावर सुटका झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी फिर्यादीने उच्च न्यायालयात धाव घेतली. चारही आरोपींवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर ३०२ चे गुन्हे दाखल केले असले तरी आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. आरोपी समाजात उजळमाथ्याने फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांवर मंत्रालयातून दबाव?
आरोपींना अटक होवू नये यासाठी अनेकजण प्रयत्न करीत असल्याचे लपून राहिले नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तथाकथित प्रतिष्ठितांपैकी काहीजण थेट मंत्रालयातील वरिष्ठांपर्यंत पोहोचले, आरोपीना काहीही करून वाचवा असे फर्मान सोडले गेले. मंत्रालयातील फोन पोलिसांपर्यंत पोहोचला आणि कदाचित त्यामुळेच आरोपींना अद्याप अटक झाली नसावी, अशी शंका आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
यासंदर्भात तपासी अधिकाऱ्यांनी एसपी साहेबांकडे बोट दाखवत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.