
सातारा भाजपामधील ‘ते’ झारीतील शुक्राचार्य कोण?
सातारा (महेश पवार):
देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची निर्विवाद सत्ता आहे. सातारा शहरात नगरपालिकेवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे तर, विरोधी नगरविकास आघाडीचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे हेही भापचे आमदार आणि मंत्री आहेत. त्यातच आता दोघांचेही मनोमिलन झाले असल्याने आगामी काळात पुन्हा या दोन नेत्यांनीच सत्ता सातारा पालिकेवर असेल, हे निश्चित आहे. हे दोघेही भाजपचे नेते आहेत पण, शहर भाजपमधून वेगळ्याच हालचाली सुरु असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
भाजपचे काही पदाधिकारी आपणच पक्षाचे मालक आहोत अशा आविर्भावात वावरत आहेत. मागील काही काळाचा इतिहास तर खूपच विचित्र होता. उदयनराजेंसारख्या मातब्बर नेत्याला खासदारकीचे तिकीट मिळू नये किंवा शिवेंद्रराजेना मंत्रिपद मिळू नये यासाठी भाजपमधीलच नामांकित ‘झारीतील शुक्राचार्यांनी’ प्रयत्न केले होते हे काही लपून राहिलेले नाही. आता हे ‘झारीतील शुक्राचार्यांनी’ कोण आहेत आणि हे पक्षवाढीसाठी अशी दुष्कृत्ये करत होते की, स्वतःचा ‘विकास’ साधण्यासाठी अशी कृष्णकृत्ये करत होते, याचा उलगडा अद्यापही झालेला नाही.
भाजप सदस्य नोंदणी अभियानामध्ये तर भलताच प्रकार पाहायला मिळाला. सातारा शहरात होणाऱ्या सदस्य नोंदणीचे श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे आणि आपल्यापेक्षा दुसरा कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे या उद्देशाने काहींनी दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला जायचे नाही असे ‘फर्मान’ इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावल्याचीही चर्चा मध्यंतरी रंगली होती.
सातारा नगर पालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. खा. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांचे कायम वर्चस्व राहिलेल्या सातारा पालिकेत भाजपने चंचुप्रवेश मिळवला आहे. असे असले तरी सध्याचे चित्र वेगळे आहे. दोन्ही नेते भाजपचे असल्याने झारीतील शुक्राचार्यांची गोची झाली आहे.
आपले महत्व कमी होईल किंवा झालेच आहे, अशी भावना या झारीतील शुक्राचार्यांची झाल्याने त्यांनी आत्तापासूनच नगरपालिकेसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. ‘या’ नतद्रष्टाना जिल्हा भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांचे बळ मिळत असल्यानेच यांचे ‘धैर्य’ वाढल्याचे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘दोन्ही राजे आता एक झालेत. त्यामुळे त्यांच्या हातात पालिकेची सत्ता जाणार, आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे ‘तुम्ही’ पालिकेची निवडणूक लढण्याची तयारी ठेवा’, अशा सूचना ‘शुक्राचार्य’ आपल्या घनिष्ट पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत असल्याचे बोलले जात आहे. सातारा शहरच नव्हे तर जिल्ह्यात भाजप नंबर एकच पक्ष झाला असताना पक्ष आणखी बळकट करण्याऐवजी ‘हे’ शुक्राचार्य कोणाचा ‘विकास’ साधण्यासाठी हे उद्योग करत आहेत? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्वार्थी, मतलबी आणि कारस्थानी पदाधिकाऱ्यांना खड्यासारखे दूर करून पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी लक्ष घालावे, अशी इच्छा निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.