कोरेगावच्या प्रांताधिकार्यांनाच रणदुल्लाबादच्या सचिवाने गंडवले ?
सातारा (महेश पवार) :
कोरेगावच्या प्रांताधिकार्यांना सचिव पदाचा राजीनामा मंजुरीचे पत्र देऊन पदरात गावची पाटीलकी मिळवून रणदुल्लाबादच्या सचिव असलेल्या जगन्नाथ देशमुख यांनी चक्क प्रांत अधिकाऱ्यांनाच फसवून दोन्ही पदावर बसून शासनाची फसवणूक करून आजवर लाखो रुपये कमवून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले.
कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद गावांचे पोलीस पाटील पद रिक्त झाल्यावर जगन्नाथ देशमुख यांची 24 जानेवारी 2018 ते 23 जानेवारी 2023 या पाच वर्षाकरिता कोरेगावच्या प्रांत अधिकारी यांनी निवड केली , मात्र दरम्यान प्रांत अधिकारी यांच्यामार्फत निवड करत असताना जगन्नाथ देशमुख हे रणदुल्लाबाद विकास सेवा सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रांत अधिकारी यांनी देशमुख यांना पोलीस पाटील पदी हजर होण्यापूर्वी सचिव पदाचा राजीनामा मंजुरीचे पत्र आदेश कार्यालयास सादर करण्याचे पत्र धाडण्यात आले. यानंतर जगन्नाथ देशमुख यांनी आपण सचिव पदाचा राजीनामा दिला असून पोलीस पाटील पदी नियुक्ती देण्यात यावी यासंदर्भात प्रांत अधिकारी यांना अर्ज करून रणदुल्लाबाद विकास सेवा सोसायटीचा सचिव पदाचा राजीनामा दिला असून तो सोसायटीने मंजूर देखील केल्याचे कळवून नियुक्ती करावी अशी मागणी करत त्यासंबंधीचे पुरावे देखील सादर केले व आपल्या पदरात गावची पाटीलकी पाडून घेतली.
मात्र ज्या व्यक्तीकडे गावचे पोलीस पाटील पद दिले त्याच पोलीस पाटलाने चक्क प्रांत अधिकाऱ्यांनाच गंडवल्याचे समोर आले . जगन्नाथ देशमुख यांनी कागदोपत्री जरी राजीनामा दिला असल्याचे पुरावे सादर केले असले तरी कोरेगावच्या सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांनी सन 2022 च्या अंकेक्षण अहवाला वरून रणदुल्लाबाद विकास सेवा सोसायटीमध्ये जगन्नाथ देशमुख हेच सचिव म्हणून काम करत असल्याचे समोर आल्याने कोरेगाव तालुक्यात खळबळ माजली असून चक्क सचिवानेच प्रांत अधिकाऱ्यांना गंडवून लाखो रुपयाचे वेतन व भत्ते याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
यामुळे कोरेगावचे प्रांत अधिकारी आता शासनाची फसवणूक करणाऱ्या त्या पोलीस पाटलावर फौजदारी गुन्हा दाखल करून , त्यांनी शासनाकडून घेतलेलं वेतन व भत्ते वसूल करून कारवाई करावी अशी मागणी जनमाणसातून होऊ लागली असून. यामुळे आता कोरेगाव चे प्रांत अधिकारी काय कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.