सातारा
सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून खाण्याचं वन समितीचे धोरण?
सातारा (महेश पवार) :
पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासन कसोशीने प्रयत्न करीत असून यासाठी अमाप पैसाही खर्च केला जात आहे. सातारा वन विभागाच्या मनमानी कारभारामुळे मात्र शासनाच्या पर्यटन वाढीच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
महाबळेश्वरमध्ये दिवसभरात विविध पॉईंट पाहत पर्यटक शेवटी सांयकाळी सहापर्यंत जेव्हा केट्स पॉईंटवर पोहोचतात तेव्हा वन व्यवस्थापन समिती अवकाळीचे कर्मचारी गेट बंद करून स्वतः घरचा रस्ता धरतात आणि पर्यटकांनाही घरचा रस्ता दाखवितात. या प्रकारामुळे पर्यटकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
सातारा वन विभागाच्या मनमानी कारभाराची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार होताना दिसून येत आहे. पर्यटन वाढीच्या नावाखाली महाबळेश्वरच्या जंगलात नाईट सफारीचा घाट घालणाऱ्या सातारा वन विभागाच्या या वन्यजीवांना धोका निर्माण करणाऱ्या धोरणा विरोधात वन्यप्रेमींनी नुकतीच तीव्र नापसंती व्यक्त केली होती. सातारा वन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने तर कहरच केला आहे. सायंकाळी अवकाळी येथील केट्स पॉईटवर जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली असून सहा वाजता गेट बंद करून वन समितीचे कर्मचारी निघून जातात. त्यामुळे दूरवरून आलेल्या पर्यटकांना पॉईंट न पाहताच परतावे लागत आहे. प्रचंड पैसे खर्च करूनही सर्व पॉईंट पाहता येत नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. किमान सात ते साडेसात वाजेपर्यंत केट्स पॉईंट पर्यटकांसाठी खोला ठेवावा अशी मागणी होत आहे.