पृथ्वीराज चव्हाण यांनी केली कोयनाकाठच्या संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी
कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड येथील कोयना नदीकाठी पूर संरक्षक गॅबियन भिंतीचे काम सुरू आहे हे काम जलद गतीने सुरू असून कृष्णाकाठच्या भिंतीला ही भिंत जोडली जाणार आहे. भविष्यात या भिंतीवरून वॉक वे व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कराड येथील कोयना नदीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी नवीन शासकीय विश्रामगृहाशेजारी, शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर तसेच शुक्रवार पेठेतील रंगारवेस येथील महादेव मंदिर परिसरात या संरक्षित भिंतीच्या कामाची पाहणी केली. एकूणच कामाची गती व कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवानेते राहुल चव्हाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे, फारुख पटवेकर, श्रीकांत मुळे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, जितेंद्र ओसवाल, दिनेश नलवडे, अमीर कटापुरे यांच्यासह टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व नागरिक उपस्थित होते.
आ. चव्हाण यांनी संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. या कामावर सध्या चारशे कामगार काम करत असून येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम गतीने पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण याबाबत पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की, आपण खासदार असताना तत्कालीन केंद्रीय जलसंधारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांना भेटलो होतो. माझ्याबरोबर ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले होते. त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे पुरापासून नुकसान होत असल्याने येथे संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतर विद्या शरण शुक्ला यांनी कराडला भेटही दिली होती. दरम्यान कृष्णाकाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ ते कृष्णा पूल या दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. आता कोयना काठच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहराचे महापुरापासून संरक्षण होणार आहे. नदीकाठी संरक्षक भिंत असणारी राज्यात मोजकी शहरे आहेत, त्यात कराडचा समावेश होणार आहे. परदेशात शहरालगतच्या नदीकाठांचे आधुनिक पद्धतीने संरक्षण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कराडला प्रयत्न करण्यात येणार आहे. भिंतीमुळे नदीकाठच्या जमिनीची धूप वाचणार आहे. संरक्षक भिंत बांधताना आवश्यक तेथे भराव, पाणी जाण्यासाठी पाईपलाईन, मंदिर परिसरातील सुशोभीकरण ही सर्व कामे केली जाणार आहेत. कामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रत्येक महिन्याला आपण या कामावर भेटी देऊन आढावा घेणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.