‘सह्याद्री’च्या गळीत हंगामाची सांगता
सातारा (महेश पवार) :
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१ – २०२२ या ४८ व्या गळीत हंगामाची सांगता आज दिनांक १८ मे २०२२ रोजी संचालक पांडुरंग चव्हाण व त्यांच्या पत्नी सरिता चव्हाण यांच्या शुभहस्ते, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे व सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कराड उत्तरचे युवा नेते मा.जशराज पाटील(बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यनारायण पूजेने करण्यात आली. दरम्यान गळीत हंगामात उत्कृष्ट काम करणाऱ्या ऊसतोडणी, वाहतूक कंत्राटदार यांचा सन्मान करण्यात आला.
प्रथेप्रमाणे हंगामात जास्तीत-जास्त ऊस तोडणी व वाहतूक करून प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या तोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार, बैलगाडीवान, ट्रॅक्टरमालक, ऊस तोडणी मशीन मालक यांना सह्याद्री साखर कारखाना व ऊस तोडणी वाहतूक संस्था यांच्यावतीने रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री आणि कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याकडे नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याची परंपरा याहीवर्षी कारखान्याकडून कायम ठेवण्यात येऊन, कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप केल्याबद्दल सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी मानसिंगराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले, स्वागत व सूत्रसंचालन वसंतराव चव्हाण यांनी केले व आभार आर.जी तांबे यांनी मानले.
दरम्यान, ऊसाने भरलेल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर गाडे आदी ऊस वाहतुकीची शेवटच्या खेपेची वाहने कारखाना कार्यस्थळावर वाजत गाजत दाखल झाली होती. चार-पाच महिन्यांपासून कारखान्याकडे ऊसतोडीचा व्यवसाय करण्यासाठी नातेवाईकांपासून दूर आलेल्या मजुरांची मूळगावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक , सभासद, अधिकारी, ऊसतोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.