
मडगांव रविंद्र भवन प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्याची मागणी
मडगाव :
रवींद्र भवन मडगावच्या अध्यक्षांनी कला राखण मंच आयोजित शांततापूर्ण सुपारी आंदोलनादरम्यान दाखवलेली अहंकारी वर्तणूक अत्यंत निंदनीय आहे, असे मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे. “कला राखण मंचाची लढाई गोमंतकीय कला आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे. कलाकारांनी केवळ पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली होती. रवींद्र भवन ही कलाकार व कलाप्रेमींना सेवा देणारी संस्था असावी, दडपशाही करणारी नव्हे,” असे ते म्हणाले.
रवींद्र भवनची रचना, कार्यक्रम वा अर्थकारण इतक्यावरच कलाकारांची चिंता मर्यादित नाही. इमारतीची सध्याची अवस्थाच प्रश्न निर्माण करणारी आहे. वारंवार गळती, स्पष्ट दुरवस्था आणि काही भाग अचानक बंद केल्यामुळे या ठिकाणच्या रचनेच्या सुरक्षिततेबद्दलही शंका निर्माण झाल्या आहेत. “अध्यक्षाने उत्तरदायित्वाने प्रतिसाद द्यायचा सोडून उलट असंवेदनशीलता आणि अवहेलना दाखवली,” असा आरोप प्रभव नायक यांनी केला.
मडगांवचो आवाज सुपारी आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. आमच्या सर्व सासष्टीच्या आमदारांना आवाहन करतो की हा मुद्दा आगामी अधिवेशनात प्रभावीपणे मांडावा. “सरकारने वेळेवर योग्य निर्णय घेतला पाहिजे. रवींद्र भवनचे भवितव्य कला अकादमीसारखे होणार नाही याची जबाबदारी सासष्टीच्या आमदारांनी घ्यावी,” असे प्रभव नायक म्हणाले.
पाय तियात्रीस्त सभागृहाचे अचानक बंद होणे हे संस्थेतील कुशासन आणि नियोजनशून्यतेचे ठळक उदाहरण आहे. यामुळे व्यावसायिक तियात्र कलाकार, सांस्कृतिक गट आणि निर्मिती संस्था यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
“रवींद्र भवन कोणाच्याही वैयक्तिक मालकीची जागा नाही. ही संस्था जनतेच्या हितासाठी आहे. कार्यकारी समितीने प्रशासनपुरती मर्यादा न ठेवता पारदर्शकता, जबाबदारी आणि जनतेच्या सहभागाचे मूल्य जपावे,” असे प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रवींद्र भवनचे अध्यक्ष आजवर कोणतीही मूलभूत माहिती देऊ शकलेले नाहीत. नुकसान किती, दुरुस्तीचा खर्च किती, की कामांची वेळमर्यादा काय या एकाही मुद्द्याचे उत्तर उपलब्ध नाही. “सार्वजनिक निधी आणि कलाकारांच्या भविष्याशी निगडित असलेल्या कामांमध्ये ही उदासीनता माफ करता येणार नाही,” असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
मडगांवचो आवाज गोव्याचे मुख्यमंत्री जे सध्या कला व संस्कृती खातेही सांभाळत आहेत, त्यांना त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतो. भविष्यातील सर्व कामांवर देखरेख ठेवण्यासाठी कलाकार प्रतिनिधींचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती त्वरित स्थापन करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.