पर्यावरणाचे रक्षण आणि गोवा वाचवण्यासाठी आमचा लढा सुरू ठेवूया : युरी
मडगाव :
आपली जीवनदायीनी आई म्हादईच्या रक्षणासाठी आपण सर्वजण आपला लढा सुरूच ठेवू या, विनाशकारी 3 रेखीय प्रकल्पांविरुद्ध आवाज उठवूया, आयआयटी प्रकल्प आणि फिल्म सिटीला विरोध करून सांगे आणि काणकोण येथील हरित जमीन व जैवविविधता वाचवण्यासाठी आपण स्वतःला वचनबद्ध करूया. गोव्याचे रक्षण करूया, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोमंतकीयांना विनाशकारी प्रकल्पांना विरोध करण्याचे आणि गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणूकांच्या निकालातून संपूर्ण राष्ट्राने “संविधानाचे रक्षण करा आणि लोकशाही वाचवा” असा जनादेश दिला आहे याचा मला आनंद आहे. “पर्यावरणाचे रक्षण करणे आणि गोवा वाचवणे” ही आता आपली जबाबदारी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
पश्चिम घाटातील जैवविविधता नष्ट करणाऱ्या आणि गोव्याचे कोळसा केंद्रात रूपांतर करणाऱ्या तीन रेखीय प्रकल्पांविरुद्ध आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. म्हादईचे पाणी वळविल्याने गोव्याचे वाळवंटात रुपांतर होणार यावर आम्ही सातत्याने चिंता व्यक्त करत आहोत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
सांगे येथील हरित जमिनीवर प्रस्तावित आयआयटी प्रकल्प आणि जैवविविधतेने समृद्ध लोलयें काणकोणच्या भगवती पठारावरील फिल्म सिटीच्या प्रकल्पांना विरोध करणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले तरच आपण ताज्या हवेचा श्वास घेऊ शकू, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
पर्यावरण, जंगल आणि वन्यजीव वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष बांधिल आहे. गोव्याची ओळख जपण्याचे आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला गोमंतकीयांच्या पाठिंब्याची गरज आहे. गोव्याची ओळख जपण्यासाठी आता सर्वांनी एकत्र काम करूया, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले.