‘दाबोळीतील निष्पाप मुलीवरील बलात्कार आणि हत्येवर आतातरी बोला’
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गोव्याची बॅडमींटनपटूचे अभिनंदन केल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहून भाजपची ट्रोल आर्मी गाढ झोपेतून उठली. भाजप सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याने दाबोळी येथे एका निष्पाप मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवर भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आतातरी काही पोस्ट करतील अशी अपेक्षा ठेवूया असा टोला काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दीकी यांनी हाणला आहे.
भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना तानीशा क्रास्टोची ओलिंपीकसाठी निवड जाहीर झाल्याच्या जवळपास एक दिवसानंतर तीचे अभिनंदन करणारा पोस्ट पल्लवी धेंपेनी समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर, शमिला सिद्दीकी यांनी दाबोळ येथे बालिकेच्या बलात्कार आणि हत्येबद्दल मौन बाळगल्याबद्दल भाजप उमेदवाराची निंदा केली.
भाजप दक्षिण गोव्याच्या उमेदवाराला दाबोळी भेटीदरम्यान मॉविन गुदिन्हो यांच्याकडून शिकवण्या घेताना संपुर्ण गोव्याने पाहिले. याच मास्तराने आपल्या स्वतःच्या मतदारसंघात झालेल्या भीषण बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर साधी संवेदना व्यक्त करण्यास पल्लवी धेंपेना सांगू नये हे खेदजनक आहे. यावरून भाजपची असंवेदनशीलता दिसून येते, असे शमिला सिद्दीकी म्हणाल्या.
गोव्यातील महिलांना बेरोजगारी, महागाई, सुरक्षितता यासारख्या अनेक समस्या आहेत. अयशस्वी भाजप सरकारच्या चुकीच्या वाहतूक व्यवस्थापनामुळे रस्त्यावर वाहन चालवताना आमच्या महिलांचा संघर्ष करावा लागतो. जीवघेण्या अपघातात अल्पवयीन मुलींचे जीव जातात. पल्लवी धेंपो यांनी या समस्यांवर बोलायला हवे. गोव्यातील महिलांना गोव्यात मोदींच्या प्रचारदूताची गरज नाही, असे शमिला सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवाराने त्यांच्या वातानुकूलित कारमधून खाली उतरून आपली उत्पादने विकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर बसणाऱ्या आदिवासी महिलांशी संवाद साधावा. भाजप सरकारने सदर महिलांसाठी काहीही केले नाही हे त्यांना समजेल, असे शमिला सिद्दीकी म्हणाल्या.
पल्लवी धेंपेनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यूच्या चौकशीची सद्यस्थिती विचारावी. त्यांनी गेल्या दहा वर्षांतील महिलांवरील अत्याचारांची आकडेवारी घ्यावी, ज्यामुळे भाजपचा ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा केवळ जुमलाच असल्याची त्याना खात्री पटेल, असा दावा शमिला सिद्दीकी यांनी केला.
गोव्यातील महिलांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. तथाकथित महिला सक्षमीकरणाची भाजपची नौटंकी आता चालणार नाही. गोमंतकीय महिला काँग्रेसच्या नारी शक्ती गॅरंटीवरच विश्वास ठेवतील, असे शमिला सिद्दीकी म्हणाल्या.