ISIS संशयित दहशतवाद्याला दिल्लीत अटक…
इस्लामिक स्टेट (ISIS) च्या एका संशयित दहशतवाद्याला आणि इतर दोन दहशतवादी संशयितांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. ISIS दहशतवादी मोहम्मद शाहनवाज उर्फ शफी उज्जामा हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात मोस्ट वॉन्टेड यादीत होता. त्याला पकडण्यासाठी ३ लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दिल्लीतील ISIS मॉड्युल दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. दरम्यान, हे मॉड्युल एका गुप्त माहितीतून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.
शाहनवाज हा व्यवसायाने इंजिनिअर असून तो पुणे आयएसआयएस मॉड्युल प्ररकणात वॉन्टेड होता. तो दिल्लीचा रहिवासी असून पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर तो दिल्लीत लपून बसला होता. शाहनवाजसह अटक झालेल्या तिन्ही संशयित दहशतवाद्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
या कारवाईदरम्यान अनेक साहित्यही जप्त करण्यात आले असून यामध्ये रासायनिक द्रव्यांचा समावेश होता. या रासायनिक द्रव्यांचा इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यासाठी केला जातो. अलीकडेच, एनआयएने शाहनवाज आणि इतर तीन दहशतवादी संशयितांची माहिती देणाऱ्या प्रत्येकी तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत एका डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.