:…म्हणूनच गोविंद गावडे, श्रीपाद नाईक आणि फ्रांसिस सार्दिन यांना स्वयंपूर्ण फेरीतून वगळले’
पणजी :
37 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी अनुसूचित जमाती, ओबीसी आणि ख्रिस्ती समाजाचा अपमान करण्यासाठीच क्रिडामंत्री गोविंद गावडे, केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक आणि खासदार फ्रांसिस सार्दिन यांना स्वयंपूर्ण फेरीतून वगळले असा गंभीर आरोप काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी नेहरू स्टेडियमवर एका होडी सारख्या दिसणाऱ्या वाहनांतून केलेल्या परेडवर टिका करताना अमरनाथ पणजीकर यांनी, पंतप्रधानांच्या सूचनेवरूनच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे लज्जास्पद कृत्य केले आहे असा दावा केला.
Why @BJP4Goa President @ShetSadanand accompanied PM @narendramodi & CM @DrPramodPSawant during Swayampurna Ferry of #37thNationalGames ? The Function organised by @GovtofGoa by spending Tax Payers Money was to promote @BJP4India for 2024 Election.We condemn this Act of Politics. pic.twitter.com/C76gdw98uP
— Amarnath Panjikar (@AmarnathAldona) October 28, 2023
देशभरात ओबीसी, एसटी, एससी आणि अल्पसंख्याक समाजाचा अपमान व थट्टा करण्याचा भाजप नेहमीच प्रयत्न करत असतो. गोव्यात एसटी समाजासाठी राजकीय आरक्षणावर भाजपचा खोटारडेपणा, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी सरकारची दिरंगाई तसेच भारताचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी आमंत्रित न करणे या घटना लोक विसरलेले नाहीत, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
भाजप सरकार कॅथलिक आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना नेहमीच सापत्न वागणूक देते. खलाशी पेंशन योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी कॅथोलिक समुदायाचे असल्याने सदर योजना कायमस्वरूपी म्हणून जाणीवपूर्वक अधिसूचित केलेली नाही, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा हे कॅथलिक असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत जाण्यास भाजपने दिले नाही. भाजपने कॅथलिकांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला आणि नंतर त्यांना नाकारले, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
गोव्याचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन खासदारांना स्वयंपूर्ण फेरीत का समावून घेतले नाही व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचीच निवड का करण्यात आली यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.