‘समुद्रकिनारे स्वच्छता करार घोटाळ्याला मान्यता दिल्याबद्दल कलाकारांचे आभार’
पणजी :
गोवा बीच क्लीनिंग कंत्राट हा भाजप सरकारचा लोकायुक्त प्रमाणित घोटाळा आहे, या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, करण कुंद्रा रेमो डिसोजा, शर्मन जोशी आणि इतरांना आमंत्रित केल्याबद्दल अमृता फडणवीस यांचे आभार अशा शब्दात काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता राखण्यात भाजप सरकारच्या अपयशाचा खरपूस समाचार घेत सोमवारी ‘क्लीन-ए-थॉन’ कार्यक्रमात मिरामार किनाऱ्यावर जो मोठा कचरा गोळा झाला तो भाजप सरकारचा किनारे सफाई कंत्राटातील भ्रष्टाचार उघड करतो असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आशीर्वादाने पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील पर्यटन विभागाचे ‘मिशन कमिशन’ जोरात सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याची तिजोरी दरमहा रिकामी होत असताना समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढिग वाढत आहेत पडतो, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.
कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळे साचलेला प्रचंड कचरा उचलण्यासाठी चित्रपट कलाकारांना मिरामार किनाऱ्यावर नेण्यात आले, ही गोव्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि अधिकार्यांना मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्यानेच कंत्राटदाराच्या कामाकडे पर्यटन खात्यातील अधिकारी जाणिवपूर्वक डोळेझाक करतात असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
राजधानी शहरातील एका समुद्रकिनाऱ्यावर ही स्थिती असेल, तर इतर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांवर काय परिस्थिती असेल याची कल्पना येऊ शकते. भाजपने कचऱ्यापासून माया कमविण्याची कला पारंगत केली आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
समुद्रकिनारे स्वच्छता घोटाळा उघड करणारे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी समुद्रकिनारे स्वच्छतेच्या कंत्राटातील तथ्ये आणि आकडेवारी समोर आणावीत अशी मी पुन्हा एकदा मागणी करतो. लोकांना सत्य कळू द्या. पर्यटनमंत्र्यांचे मौन हे तेच आता घोटाळ्याचे आश्रयदाते झाल्याचे सिद्ध करते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.