१७०० कोटीचा निर्माणधीन पूल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला
भागलपूर:
बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी ( ४ जून ) सायंकाळी कोसळला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. पूल कोसळल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधला जात होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०१४ साली पुलाची पायाभरणी केली होती. १७०० कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या पुलाचा स्लॅब दोन वर्षापूर्वी कोसळला होता. या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज येथे गंगा नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. पूल गंगा नदीत कोसळल्याने पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. पूल कोसळल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जनता दल यूनायटेड ( जेडीयू ) चे आमदार ललित मंडल यांनी सांगितलं की, “ही दुर्दैवी घटना आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पुलाचे उद्घाटन होईल, अशी आम्हाला आशा होती. पण, अशा घटना घडत असतील, तर हा चौकशीचा भाग आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार,” अशी माहिती मंडल यांनी दिली.
विरोधी पक्षनेते विजय कुमार यांनी म्हटलं की, “२०१४ साली ६०० ते ७०० कोटी रुपयांच निर्माण होणाऱ्या पुलांची किंमत १६०० कोटींवर पोहचली आहे. उच्च अधिकाऱ्यांनी कमिशनच्या माध्यमातून पैसे घेतले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बिहारचे नागरिक कधीच माफ करणार नाही,” असं विजय कुमार म्हणाले.
…