
केरळचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी मुख्यमंत्री वी. एस. अच्युतानंदन यांचे निधन
थिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते वि. एस. अच्युतानंदन यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्यावर थिरुवनंतपुरम येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
२३ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते आयसीयू मध्ये जीवनरक्षक औषधांवर उपचार घेत होते. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन आणि अन्य नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
वि. एस. अच्युतानंदन यांनी २०१९ पासून सक्रीय राजकारणातून स्वत:ला दूर ठेवले होते. ते केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री होते. त्यांनी २००६ ते २०११ या कालावधीत मुख्यमंत्रीपद भूषवले. याशिवाय त्यांनी तीन वेळा विरोधी पक्षनेते म्हणूनही भूमिका बजावली.
१९८५ मध्ये ते सीपीएमच्या पॉलिटब्युरोचे सदस्य झाले होते. मात्र २००९ साली वैचारिक मतभेदांमुळे आणि नेतृत्वातील वादांमुळे त्यांना कार्यकारिणीतून बाहेर पडावे लागले. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९६५ मध्ये अंबलाप्पुझा मतदारसंघातून पराभवातून झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी पक्षात लोकांमध्ये लोकप्रियता मिळवत अंबलाप्पुझा, मारारिकुलम आणि मलमपुझा या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व २०१६ पर्यंत केले.
वि. एस. अच्युतानंदन यांचा जन्म १९२३ मध्ये पुथुपल्ली (पुन्नप्रा), अलप्पुझा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील शंकरन आणि आई अक्कम्मा हे दोघेही सर्वसामान्य पार्श्वभूमीतून आलेले होते. पुन्नप्रा-वायलारचा उठाव केरळमधील साम्यवादी चळवळीतील ऐतिहासिक क्षण मानला जातो. १९७० मधील अलप्पुझा जाहीरनामा अच्युतानंदन यांच्या राजकीय कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी ईएमएस सरकारने पारित केलेल्या जमीन सुधारणांचा प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी संघर्ष केला.
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक ठोस निर्णय घेतले.
मुन्नारमधील अतिक्रमणविरोधी मोहिम,
वळ्लारपाडम टर्मिनलसाठी जमीन संपादन,
कोल्लम येथे आयटी पार्कची उभारणी,
कण्णूर विमानतळासाठी प्रस्ताव,
चेरथलामधील इन्फोपार्क,
भातशेती पुनरुद्धार मोहीम,
बेकायदेशीर लॉटरी माफियाविरोधातील कारवाई
वि. एस. अच्युतानंदन हे एक सच्चे मार्क्सवादी विचारवंत, कार्यकर्ते आणि एक प्रेरणास्थान होते. त्यांचा मृत्यू ही केरळच्या समाजवादी चळवळीला मोठी हानी आहे. सरकारतर्फे त्यांच्या निधनाबद्दल शोक जाहीर करण्यात आला असून राज्यात सरकारी शोक आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.