विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी
गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निच्छित झाली आहे. अधिवेशन 16 ते19 जानेवारी दरम्यान ४ दिवसांचे होणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषद घेत अधिवेशनाचे दिवस ठरवण्यासाठी लवकरच कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक बोलावली जाईल असे सांगितले होते.
विधानसभेचे मागील पावसाळी अधिवेशन जुले 2022 मध्ये बारा दिवसांचे घेण्यात आले होते. काँग्रेसच्या आठ आमदारांनी 14 सप्टेंबर, 2022 रोजी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभेत काँग्रेसचे तीन, आपचे दोन तसेच गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचा प्रत्येकी एक असे विरोधकांच्या पारड्यात विधानसभेत केवळ सात आमदारांचे बळ आहे. तर सत्ताधारी भाजपकडे इतिहासात प्रथमच ३३ आमदारांचे बळ आहे.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईं तसेच, रिव्हॉल्युशनरी गोवन्स व आम आदमी पक्षाच्या वतीने वारंवार विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच अधिवेशनात पुन्हा सत्ताधारीच विरोधकांवर वरचढ होण्याची शक्यता आहे.