google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘कार्निव्हलला ग्रहण लावण्यासाठीच बाबा रामदेवच्या योग सत्राचे आयोजन…’

मडगाव :
गोव्यातील पारंपारिक कार्निव्हल महोत्सवाला ग्रहण लावण्याचे आणि सर्व शिक्षक तसेच आणि एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट आणि गाईड स्वयंसेवकांना सोमवार 20 फेब्रुवारी 2023 रोजी बाबा रामदेव यांच्या योग सत्राला उपस्थित राहणे अनिवार्य करण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही. शिक्षण खात्याने जारी केलेले परिपत्रक त्वरित मागे घ्यावे अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

भाजपचे ब्रॅंड ॲबासीडर बाबा रामदेव यांची भेट, त्यांच्या योग सत्राची वेळ व सरकारने गोव्यातील पारंपारिक कार्निव्हल उत्सवांना परवानगी नाकारणे हा गोव्यातील कार्निव्हल उत्सवाला ग्रहण लावण्याचा भाजप सरकारच्या मोठ्या कटाचा भाग आहे. योग शिबीराच्या खासगी कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी जारी केलेले शिक्षण खात्याचे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील इव्हेंट मॅनेजर भाजप सरकारला खाजगी संस्थेच्या योग सत्राला कमी प्रतिसाद लाभणार याची भिती असल्यानेच शिक्षक, एनसीसी, एनएसएस आणि स्काउट आणि गाईडच्या स्वयंसेवकांना बाबा रामदेव यांच्या योग सत्राला उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. हे परिपत्रक तात्काळ मागे घ्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

योग सत्राला उपस्थित राहण्यासाठी कोणावरही सक्ती करण्याचा सरकारला अधिकार नाही. शासनाच्या परिपत्रकामुळे सोमवारी सायंकाळी नियमित वर्ग होणार नाहीत. खाजगी कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ही अघोषित सुट्टी आहे का? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

आरएसएसचे सहयोगी आणि भाजपचे ब्रँड अॅम्बेसेडर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी भाजप सरकारने वेळोवेळी आपला पाठिंबा दिला  आहे. योग शिबीरावर सरकार किती पैसे खर्च करते यावर आमचे लक्ष आहे, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासगी कार्यक्रमाच्या प्रोत्साहनांमध्ये गुंतण्यापेक्षा पॅरा-टीचर्सना वेळेवर पगार देणे, माध्यान्ह भोजन पुरवठादारांची थकबाकी देणे आणि बाल रथ चालकांचे प्रश्न सोडवणे यावर भर द्यावा, अशी मागणी दोन्ही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!